गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचं वातावरण होतं. परंतु आता तणावाचं वातावरण कमी होताना दिसत आहे. भारत चीन सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली. देहरादून येथील सैन्य अकादमीमध्ये शनिवारी पासिंग आऊट परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर ते बोलत होते.

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावावरून केंद्र सरकारवरही निशाणा साधण्यात येत होता. तसंच अनेकांनी याबाबत चिंताही व्यक्त केली होती. अशा परिस्थितीतच लष्कर प्रमुख नरवणे यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आश्वासन देशवासीयांना दिला. “चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमा पूर्णपणे नियंत्रणात आहेत, याचं मी आश्वासन देतो. तसंच चीनसोबत आमची कमांडर स्तरावरील बैठकीचं सत्र सुरू आहे,” असं नरवणे म्हणाले.

“याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरही समान रँकच्या कमांडर्ससोबत चर्चां सुरू आहेत. त्याद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. “याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरही समान रँकच्या कमांडर्ससोबत चर्चां सुरू आहेत. त्याद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. नेपाळसोबत सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. “आमचे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध आहेत. दोन्ही देशांच्या लोकांना एकत्र जोडण्यासाठी आमच्याकडे चांगल्या व्यक्ती आहे. आमचे संबंध कायम उत्तम होते आणि भविष्यातही राहतील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळी पावणे सातच्या सुमारास सर्व कॅडेट्स आयएमएच्या मैदानावर पोहोचले होते. त्यानंतर परेड सुरू झाली. सर्वप्रथम डिप्टी कमांडेंट यांनी परेडला सलामी दिली. त्यानंतर कमांडेंट लेफ्टनंट जनरल जयविर सिंह नेगी यांनी परेडची सलामी स्वीकारली. त्यानंतर लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी परेडचं निरिक्षण केलं. भारताच्या ३३३ कॅडेट्सनं आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. यासोबतच ९० परदेशी कॅडेट्सही यात सहभागी झाले होते. त्यांनीदेखील आयएमएमधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं.

करोना संकटादरम्या पार पडलेल्या परेडमध्ये प्रोटोकॉल पूर्णपणे पाळले हेले. तसंच कॅटेड्सनं मास्क परिधान करून परेड केली. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. दरम्यान, या परेडचं युट्यूबर थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. यावेळी नरवणे यांनी कॅडेट्सच्या कुटुंबीयांना संबोधितही केलं. “आजवर ही तुमची मुलं होती आता ती आमची झाली आहे,” असं ते यावेळी म्हणाले. तसंच अकादमीच्या इतिहासात प्रथमच कॅडेट्सच्या कुटुंबीयांच्या त्यांच्या गणवेशावर स्टार लावता आले नसल्याचंही दिसलं.