जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याात बुधवारी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून गोळीबारासह मोठया प्रमाणावर तोफगोळयांचा मारा करण्यात आला. यामध्ये एक जवान शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाला आहे.

“राजौरी आणि पुँछ जिल्ह्यातील तारकुंडी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून मोठया प्रमाणावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला. पाकिस्तानकडून झालेला गोळीबार आणि तोफगोळयांच्या माऱ्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले” अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्याने दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

पाकिस्तानने केलेल्या तोफगोळयांच्या माऱ्यामध्ये राजधानी गावातील नयामतुल्ला (३५) हा नागरिक जखमी झाला. “या नागरिकाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या प्रकृतीला कुठलाही धोका नाही” असे राजौरी जिल्हायेच पोलीस अधीक्षक चंदन कोहली यांनी सांगितले.

त्याशिवाय मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात गुरुवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु झाली. बडगामच्या पठानपोरा गावामध्ये दोन ते तीन दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हे ऑपरेशन सुरु झाले. रविवारपासून काश्मीरमधील हे चौथे एन्काऊंटर आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात याआधी झालेल्या तीन एन्काऊंटरमध्ये १४ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.