दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम राबवण्यासाठी रविवारपासून काश्मीर खोऱ्यात लष्कर, नौदल आणि एअर फोर्सच्या स्पेशल फोर्सेस तैनात करण्यात आल्या आहेत. तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे. लष्कराच्या पॅरा युनिटचे कमांडो, नौदालाची मरीन कमांडो फोर्स (मार्कोस) आणि इंडियन एअर फोर्सच्या गरुड कमांडो पथकाचा यामध्ये समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या विभागातंर्गत काश्मीरमध्ये तिन्ही सैन्य दलांची विशेष कमांडो फोर्स तैनात करण्यात आली आहे. भारतीय लष्कराचा मेजर जनरल या स्पेशल फोर्सेसचा प्रमुख असेल. श्रीनगर शहर आणि ग्रामीण भागात कमांडोंच्या या विशेष तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.

वुलर तळयाजवळ नौदलाचे मार्कोस कमांडो तर लोलाब आणि हाजीन भागात एअर फोर्सचे गरुड कमांडो तैनात राहतील. लष्कराच्या पॅरा कमांडोंनी यापूर्वी सुद्धा काश्मीर खोऱ्यात वेगवेगळी ऑपरेशन्स केली आहेत. भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स सोबत मिळून हे कमांडो दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम राबवतील.