चकमकीत चार जवान शहीद; तीन दहशतवादीही ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या मछिल क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर रविवारी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत एका लष्करी अधिकाऱ्यासह अन्य तीन जवान शहीद झाले. चकमकीत तीन दहशतवादीही ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुपवाडा जिल्ह्य़ातील मछिल क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. या वेळी लष्करातील एका अधिकाऱ्यासह तीन जवान आणि सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान असे चार जण शहीद झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मछिल क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या हालचाली दिसताच जवानांनी तत्परतेने कारवाई केली. चकमकीत शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱ्यासह अन्य दोन जवानांची नावे तत्काळ समजू शकली नाहीत. मात्र, बीएसएफच्या शहीद जवानाचे नाव सुदीप कुमार (३८) असल्याचे सांगण्यात आले. चकमकीत काही जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.