26 September 2020

News Flash

पाकिस्तानची पुन्हा आगळीक ; गोळीबारात एक भारतीय जवान शहीद

पाकिस्तानी फौजांनी गुरुवारी सकाळी सुंदरबनी सेक्टरच्या केरी पट्टय़ात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले

| March 22, 2019 02:24 am

यश पौल

जम्मू : पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्य़ात नियंत्रण रेषेनजीकच्या भागात आणि सीमा चौक्यांवर केलेल्या तोफगोळ्यांच्या जोरदार माऱ्यात लष्कराचा एक जवान शहीद झाला.

पाकिस्तानी फौजांनी गुरुवारी सकाळी सुंदरबनी सेक्टरच्या केरी पट्टय़ात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळच्या गोळीबारात २४ वर्षे वयाचा यश पॉल हा रायफलमन शहीद झाला. तो काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्य़ातील मनतलाई खेडय़ाचा रहिवासी होता. रात्री उशिरापर्यंत सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता.

नौशेरा सेक्टरमध्ये दुपारी पावणेतीनच्या सुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी फौजांनी गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

राजौरी जिल्ह्य़ातही पाकिस्ताने लष्कराने नियंत्रण रेषेनजीक केलेला तोफगोळ्यांचा मारा व गोळीबार यात एक लष्करी जवान शहीद आणि इतर चौघे जखमी झाले. गंभीररीत्या जखमी झालेला रायफलमन करमजित सिंग हा नंतर उपचारादरम्यान मरण पावला, अशी माहिती प्रवक्त्याने दिली.

शस्त्रसंधी भंगावर दृष्टिक्षेप..

सोमवारी रात्री पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचा भंग करत अखनूर व सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रणरेषेनजीक तोफगोळे आणि लहान शस्त्रांनी गोळीबार केल्याचे संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले.  त्यानंतर गुरुवापर्यंत आगळिकीच्या अनेक घटना पाकिस्तानकडून झाल्या. जानेवारीपासून पाकिस्तानी फौजांनी नियंत्रण रेषेनजीक सुमारे ११० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये पाकिस्तानी फौजांनी भारत- पाक सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याच्या सर्वाधिक घटना २०१८ साली घडल्या असून त्या वर्षी असे २९३६ प्रकार झाले आहेत.

एक ओलीस : जम्मू- काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्य़ातील हाजिन येथे झालेल्या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी दोन नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यापैकी एकाची सुरक्षा दले आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सुटका करण्यात आली, तर एक अल्पवयीन मुलगा अद्यापही दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्या या मुलाच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत, असे जम्मू- काश्मीर पोलिसांनी ‘ट्विटर’वर सांगितले. काश्मीरमध्ये गुरुवार सकाळपासून सुरू झालेली ही दुसरी चकमक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 2:24 am

Web Title: army soldier killed in pakistan firing on loc
Next Stories
1 बर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास
2 काबूलमधील स्फोटात ६ जण ठार
3 लातूरमध्ये भाजपाने उमेदवार बदलला, नगरमधून सुजय विखेंना तिकीट
Just Now!
X