भारतीय संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेकडून सहा लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. भारत अमेरिकेकडून ६ एएच-६४ ई अपाचे हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार आहे. याआधी भारताने २२ हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. मात्र आता आणखी ६ हेलिकॉप्टर्सची स्वतंत्र खरेदी केली जाणार आहे. संरक्षण मंत्रालयातील सर्वोच्च निर्णायक संस्था असलेल्या संरक्षण संपादन परिषदेने या खरेदीला हिरवा कंदील दिला आहे. यासाठी ४ हजार १६८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

भारतीय सैन्याने संरक्षण मंत्रालयाकडे या हेलिकॉप्टर्सची मागणी केली होती, अशी माहिती मंत्रालयतील सूत्रांनी दिली. भारतीय सैन्याकडून ११ अपाचे हेलिकॉप्टर्सची मागणी करण्यात आली होती. मात्र संरक्षण मंत्रालयाच्या वित्तीय समितीने ६ हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी दिली. याआधी सप्टेंबर २०१५ मध्ये संरक्षण मंत्रालयाने २.२ अब्ज डॉलर्सचा करार करत २२ अपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी दिली होती. हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणारी ही हेलिकॉप्टर्स पाकिस्तान आणि चीन सीमेवर तैनात केली जाणार आहेत. या लढाऊ हेलिकॉप्टर्समुळे हलाई दलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.

अपाचे हेलिकॉप्टर्स पाकिस्तान आणि चीन सीमेवर तैनात केली जाणार असल्याचा मोठा फायदा हवाई दलाला मिळेल. भारत अपाचे हेलिकॉप्टर्ससोबतच त्यासंबंधीची उपकरणे, सुटे भाग आणि दारुगोळादेखील खरेदी करणार आहे. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पंजाबमधील पठाणकोटच्या हवाई तळावर आणि आसामच्या जोरहटमध्ये अपाचे हेलिकॉप्टर तैनात केली जाणार आहेत. बोईंग एएच-६४ अपाचे दोन टर्बोशाफ्ट इंजिन हेलिकॉप्टर आहे. अपाचे हेलिकॉप्टर रात्रीच्या अंधारातही उड्डाण करु शकते. या हेलिकॉप्टरने ३० सप्टेंबर १९७५ मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. जगात या हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वापर केला जातो.