संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सोमवारचा दिवस हा रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन गाजण्याची शक्यता दिसत आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या विषयासंदर्भात संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी करणारा प्रस्ताव सोमवारी सकाळी संसदेमध्ये सादर केल्याचे वृत्त टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलं आहे. अर्णब यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याचा दावा चतुर्वेदी यांनी केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार प्रियंका चतुर्वेदी यांनी लीक झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या मुद्द्यावरुन हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून यावरुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी करत सस्पेन्शन ऑफ बिझनेस नोटीस देण्याची मागणी केलीय. हे चॅट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे उल्लंघन आहे असंही प्रियंका यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या संवादावरून अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या.  दोघांमधील संवादामध्ये मंत्र्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर बालाकोट एअर स्ट्राईकबद्दलही संवाद झालेल्याचे दिसून आलं आहे. समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे. याशिवाय फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडविलेल्या आत्मघातकी हल्ल्याबाबत अर्णब यांचे आक्षेपार्ह विधान आढळते. या हल्ल्यात ४० केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. या व्हॉट्सअ‍ॅप संवादात पुलवामा हल्ल्याबाबत अर्णब यांनी केलेल्या विधानाचा समाचार नागरिकांनी ट्वीटरसह अन्य समाजमाध्यमांवरून घेतला. समाजमाध्यमांवर शुक्रवारी याच संवादांबाबत चर्चा होती. मीम्स आणि टीकेचा भडीमार होताना दिसला.

काँग्रेसने केलेली स्पष्टीकरणाची मागणी

हे चॅट समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आणि मोदी सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.  मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणला असून त्यामध्ये रिपब्लिक चॅनलची चौकशी चालू आहे. त्याचबरोबर बार्क चे पूर्व प्रमुख पार्थो दास गुप्ता यांना अटकही करण्यात आलेली आहे. सदर टीआरपी घोटाळा दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून झाला असून त्या करता उत्तरप्रदेशमध्ये वेगळी केस नोंदवण्याचा प्रकार देखील घडला. हा सगळा आटापिटा आपलं कारस्थान उघड पडेल या हेतून होता, हे  व्हॉट्सअ‍ॅप चॅट वरून दिसून येत आहे. सदर चॅट्स मधून रिपब्लिक चॅनेलचे प्रमुख आपली पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय आणि एएस नवाच्या व्यक्तीशी जवळीक असल्याचे सांगत असल्याचे दिसून येते असल्याचे सांगत आहे, याकडे सावंत यांनी लक्ष वेधलं होतं. त्याचबरोबर केंद्र सरकारशी संबंध असल्याने हे दोन्ही व्यक्ती रिपब्लिक चॅनलच्या टीआरपीमध्ये वाढ होण्याची व्यूव्हरचना तयार करत होते, हे ही दिसून येते. यामध्ये एएस नावाची व्यक्ती कोण आहे, हे भाजपने स्पष्ट करण्याची गरज आहे. तसेच रिपब्लिक चॅनलबद्दल माहिती जनसंपर्क मंत्रालयाला मिळालेली तक्रार बाजूला ठेवण्यात आली आहे, असे मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी सांगितले, असे यात नमूद करण्यात आलेले आहे याचाच अर्थ रिपब्लिक चॅनलला वाचविण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत होते हे स्पष्ट आहे, असा आरोप सावंत यांनी केला होता.