गुरगांव : पाकिस्तान पुरस्कृत छुपे युद्ध आणि दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अनुच्छेद ३७० रद्द करून निर्णायक संघर्ष सुरू केला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दीर्घकाळ शांतता नांदेल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) ३५ व्या स्थापनादिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शहा उपस्थित होते. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरसाठी असलेली विशेष तरतूद रद्द करण्याच्या निर्णयामुळे काश्मीर खोऱ्यातून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पूर्णपणे नायनाट होईल. दहशतवादाच्या बाबतीत कोणालाही दयामाया दाखविली जाणार नाहीस सर्व स्वरूपातील दहशतवादाचा नायनाट केला जाईल हे सरकारचे धोरण आहे, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एनएसजी हे महत्त्वाचे हत्यार आहे, असेही गृहमंत्री म्हणाले. अनुच्छेद ३७० रद्द करून पंतप्रधान मोदी सरकारने छुपे युद्ध आणि दहशतवाद याविरुद्ध निर्णायक लढा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दीर्घकाळ शांतता नांदेल, असे शहा यांनी येथे स्पष्ट केले. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला दहशतवादाने ग्रासले आहे आणि जगात असे थोडेच देश असतील की त्यांनी दहशतवादाचा असा दीर्घ मुकाबला केला असेल, दहशतवाद हा सुसंस्कृत समाजाला मिळालेला शाप आहे, असेही ते म्हणाले.