वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत भारताविरोधात गरळ ओकली आहे. जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या निर्णयावर बोलताना झाकीर नाईक याने हे असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे. “भारत पाकिस्तानविरोधी असून त्यांना इस्त्राइलकडून प्रशिक्षण मिळत आहे. पॅलेस्टाइन कशाप्रकारे नष्ट करण्यात आलं याचं प्रशिक्षण ते घेत आहेत. त्यांना काश्मीरसोबत तेच करायचं आहे”, असा आरोप झाकीर नाईकने केला आहे.

“जोपर्यंत स्वतंत्रता अबाधित आहे तोपर्यंत भारताचा भाग राहण्याची जम्मू काश्मीरची भूमिका होती. पण ७० वर्षांनी इस्लामविरोधी सरकार असणाऱ्या भाजपाला हे नको आहे. हे कऱण्यासाठी त्यांच्याकडे एकच मार्ग होता तो म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत मिळवणे. जम्मू काश्मीरला भारताचा भाग करणं असंवैधानिक आहे”, असं झाकीर नाईक याने म्हटलं आहे.

पुढे त्याने म्हटलं आहे की, “काही मुस्लिम देश विरोध करत आहेत, पण एकत्र येत नाहीत”. यावेळी झाकीर नाईकने काश्मीर मुद्द्याची तुलना इस्त्राइल-पॅलेस्टाइन संघर्षाशी केली आहे. “ज्याप्रकारे पॅलेस्टाइनला नष्ट करण्यात आलं आणि इस्त्राइलने वर्चस्व मिळवलं…तेच काश्मीरमध्ये करण्याची यांची इच्छा आहे”, असं झाकीर नाईकडने म्हटलं आहे.

झाकीर नाईक इतक्यावर थांबला नाही. “१९४७ च्या फाळणीदरम्यान भारताने तीन भागांत मुस्लिमांची विभागणी केली. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश अशी ही विभागणी करण्यात आली. काश्मीरने भारतासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण यावेळी आपण स्वतंत्र राहू अशी अट ठेवण्यात आली. आणि आता त्यांना हा दिवस पहायला लागत आहे. मुस्लिम देशांनी याविरोधात एकत्र आलं पाहिजे”, असं झाकीरने म्हटलं आहे.