जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी)चे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी देशभरातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सर्व सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, विविध राज्यांमधील विधानसभेतील पक्षनेते व राज्यांचे प्रभारी बोलवण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्या गेल्याबद्दल बैठकीत प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे.

या अगोदर मंगळवारी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक एआयसीसीच्या कार्यालयात पार पडली. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे व जम्मू -काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून संसदेत मंगळवारी जोरदार चर्चा झाली होती. काँग्रेसने यावरून सरकारचा विरोधही केला, मात्र अखेरीस राज्यसभेनंतर लोकसभेतही हे विधेयक मंजूर झाले.