दिल्ली क्रिकेट संघटनेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून हल्ला
आम आदमी पक्षाने दिल्ली क्रिकेट संघटनेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरोधातील आक्रमणाची धार आणखी तीव्र केली. या भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या समितीच्या अहवालावर लवकरच कार्यवाही करणार असल्याचे ‘आप’ने सांगितले.
जेटली यांनी गुरुवारी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. परंतु आपल्या कारकीर्दीत कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याच्या जेटली यांच्या दाव्यांना न बधता त्यांनी आपल्या बचावार्थ मांडलेले मुद्दे संदिग्ध आणि दिशाभूल करणारे असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली. या संदर्भात ‘आप’चे नेते आशुतोष यांनी पत्रकार परिषद घेतली. दिल्ली क्रिकेट संघटनेने ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ नामक कंपनीला फिरोजशहा कोटला मैदानावरील दहा कार्पोरेट दालने लीजवर देण्याचा निर्णय घेतला होता. ही कंपनी जेटली यांच्या मित्राच्या मालकीची असून त्या बदल्यात या व्यवहारात त्यांना पाच कोटी रुपये मिळाले, असा आरोप आशुतोष यांनी केला. या कंपनीशी असलेल्या संबंधांचा जेटली यांनी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. कोटला स्टेडियमच्या उभारणीतही झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी या वेळी करण्यात आली.
दिल्लीचे प्रधानसचिव राजेंद्रकुमार यांचे कार्यालय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सील केले होते. विरोधकांना लक्ष्य करण्याचा आदेश सरकारने ‘सीबीआय’ला दिल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. तेव्हापासून दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराचे प्रकरण ‘आप’च्या नेत्यांनी लावून धरले असून जेटली यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.