माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज दुपारी १२ वाजून ०७ मिनिटांनी निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. हे वृत्त समोर आल्यानंतर परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेटलींच्या कुटुंबियांचे फोनवरुन सांत्वन केले. यावेळी जेटलीच्या कुटुंबियांना मोदींनी तुम्ही दौरा अर्धवट सोडून येऊ नका असं सांगितल्याचं कळतं.

जेटलींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जेटलींच्या नातेवाईकांना फोन करुन दु:ख व्यक्त केले आणि त्यांचे सांत्वन केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी जेटली यांची पत्नी संगीता आणि मुलगा रोहन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. तुमच्या दुःखात सहभागी आहे असे सांगत मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न मोदींनी केला. या फोन कॉल दरम्यान जेटली यांचे पुत्र रोहन यांनी यावेळी मोदींना परदेश दौरा अर्ध्यावर सोडून येऊ नये अशी विनंती केली. ‘तुम्ही देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेला आहात. शक्य असल्यास तुम्ही दौरा रद्द करु नका. देश हा सर्वात आधी येतो. त्यामुळे तुम्ही तुमचा दौरा पूर्ण करुनच परत या,’ अशा शब्दांमध्ये रोहन यांनी मोदींना विनंती केली.

दरम्यान, मोदी यांच्या दौऱ्यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. २२ ऑगस्टपासून मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. मोदी आज बहरीनमध्ये पंतप्रधान शेख खलिफा बीन सलमान अल खलिफा यांची भेट घेणार असून दोन्ही देशांच्या संबंधांबद्दल चर्चा करणार आहेत. त्यानंतर मोदी जी ७ परिषदेसाठी पुन्हा फ्रान्सला जातील. २५ ते २६ ऑगस्ट दरम्यान ते फ्रान्समध्ये असतील. त्यावेळी मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबरही चर्चा होणार आहे.

मोदींनी ट्विटवरुनही जेटली यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. देशाच्या राजकारणातला दिग्गज नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. अरुण जेटली यांची उणीव कायम भासेल त्यांच्या निधनामुळे अतीव दुःख झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी ट्विटवरुन दिली आहे. मी माझा सर्वात जवळचा मित्र गमावला असंही मोदी यांनी म्हटलं आहे.