अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात दरड कोसळून १६ जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. नॅशनल डिझास्‍टर रिस्‍पॉन्‍स फोर्सची (एनडीआरएफ) एक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. तवांगमधील एक लेबर कॅम्प शुक्रवारी भूस्खलनामुळे वाहून गेल्याचे पोलीस अधिकारी नबीन पायेंग यांनी सांगितले. ही घटना घडलेले स्थळ ७५०० फूट उंचीवर आहे. मदतकार्य करणाऱ्यांना १६ मृतदेह सापडले असून, अन्य दोन मजूर चिखलाखाली गाडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तीन मजुरांना चिखलाखालून बाहेर पडण्यात यश प्राप्त झाल्याचे समजते. गत सप्ताहापासून सतत होत असलेल्या पावसाने दरडी कोसळत आहेत. अनेक भागात भूस्खलन झाले असून, काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. घरांनादेखील नुकसान पोहचले आहे. पावसामुळे मदतकार्यातदेखील अडथळा निर्माण होत आहे.