अरुणाचल प्रदेशमध्ये जमावाने बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींना पोलीस ठाण्यातून बाहेर काढून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत दोन्ही आरोपींचा मृत्यू झाला असून या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. जमावाने पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात काही पोलीसही जखमी झाले आहेत.

तेझू गावातील पाच वर्षांच्या मुलीचे १२ फेब्रुवारी रोजी अपहरण झाले होते. पाच दिवसांनी तिचा मृतदेह सापडला होता. बलात्कारानंतर तिची हत्या केल्याचे शवविच्छेदनातून समोर आले होते. अत्यंत अमानूषपणे तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात रविवारी पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती. संजय सोबोर (३०) आणि जगदिश लोहार (२५) अशी या आरोपींची नावे होती. या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठढी सुनावली होती.

सोमवारी हजारोंच्या जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. जमावाने आरोपींना पोलीस कोठडीतून बाहेर काढले. पोलीस ठाण्यात कर्मचारी ड्यूटीवर होते. मात्र, जमावासमोर पोलिसांचे संख्याबळ अपुरे होते. जमावाच्या हल्ल्यात पोलीसही जखमी झाले. जमावाने दोन्ही आरोपींना मारहाण करत बाजारपेठेपर्यंत आणले. यानंतर दोघांनाही अमानूष मारहाण करण्यात आली. यात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह मुख्य चौकात सोडून जमाव तिथून निघून गेला.

मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ‘बलात्कार व हत्येची घटना क्रूरतेचा कळस होती. मात्र जमावाने केलेल्या हल्ल्याचा प्रकारही दुर्दैवी आहे, असे त्यांनी सांगितले. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, या घटनेची पोलीस चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. सोमवारी रात्रीपर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक झाली नव्हती. पोलीस महासंचालकांनी पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे.

यापूर्वी मार्च २०१५ मध्ये नागालँडमधील दिमापूर येथे बलात्कार प्रकरणातील आरोपीला जमावाने पोलीस ठाण्यातून बाहेर काढून त्याची हत्या केली होती. यानंतर त्याला भरचौकात फासावर लटकवण्यात आले होते.