गळ्याभोवती मफलर, अंगात लाल रंगाचे स्वेटर व डोक्यावर ‘आम आदमी पार्टी’ लिहिलेली टोपी घालून हा नेता घराबाहेर पडतो. नवी दिल्ली मतदारसंघात अर्धा दिवस फिरणार असतो. त्याच्यासोबत त्याच्या घरापासून निघालेला ‘जनांचा प्रवाहो’ मंदिर मार्गावर येतो. तिथे कार्यकर्ते जमलेले असतात. या नेत्याचे वाहन दिसताच ‘पाँच साल..’चा गजर सुरू होतो. कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करीत, त्यांच्यासोबत सेल्फी काढणारा नेता  गर्दीतल्यांना आपल्यातलाच कुणी तरी वाटत असतो. या वेळी विसरू नका; पूर्ण बहुमत द्या. १५ तारखेला शपथविधीला या.. नेत्याच्या आवाहनाला जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. हुर्रे.. म्हणत आनंद व्यक्त करणारा जनसमुदाय नेत्यासोबतच पुढे सरकतो.
आर. के.आश्रम मेट्रो स्टेशनपासून एक रस्ता सरळ पहाडगंज परिसरात जातो. याच रस्त्याच्या शेवटी चौकात बृहन्महाराष्ट्र मंडळाची इमारत आहे. तिथपर्यंत नेत्याच्या स्वागताला सर्व जण उभे असतात. सर्व जण म्हणजे सायकल रिक्षावाले. काही ऑटोवालेही असतात.. अंगाखांद्यावर ‘झाडू’चं चिन्ह असलेला गमछा मिरवत हे सर्व जण नेत्याची वाट पाहत असतात. दुरून नेता येतो. सामान्यांचे कुतूहल चाळवते. तिथे तैनात असलेल्या पोलिसाला एक जण विचारतो- केजरीवाल आ रहे हैं क्या? त्यावर तो पोलीस अत्यंत उच्च स्वरात म्हणतो – कौन केजरीवाल? वह तो भाग गया. विचारणारा म्हणतो- इतना गुस्सा क्यों; उसने आप का क्या बिगाडा? पोलिसाचा स्वर काहीसा खाली जातो. तो म्हणतो- ‘हमारे लिए कुछ नही किया. उल्टा उसकी वहज से  लोग हमें कुछ नही समझते थे. हम लोगों के दुश्मन नही. लेकीन उसने लोगों के और हमारे बीच जहर घोला..पहले भ्रष्टाचारा मिटाओ. वो छोडके हमारे पीछे पड गया. हमारे खिलाफ धरनाप्रदर्शन किया.’ विचारणारा गतवर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या आसपास घडलेल्या नाटय़ाशी याचा संदर्भ जोडतो.
एव्हाना नेत्याचा ‘रोड शो’ स्वागताच्या ठिकाणी पोहोचलेला असतो. सायकल रिक्षावाल्यांमध्ये उत्साह संचारतो. ‘पाँच साल..- चलाओ झाडू- ‘ना भूलना-मुहर झाडू पर लगाना’- ‘आम आदमी के सन्मान में – झाडू मैदान में’..अशा घोषणा दिल्या जातात. नेता सर्वाशी हात मिळवतो. तेथून तडक नेता पोहोचतो पालिका धाममध्ये. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वसाहत असलेला भाग. जवळच धोबीघाट असतो. तिथल्या एका घोलीत पाच-सात माणसे राहतात. तेथील लोकांशी हा नेता हात मिळवतो. एका घरातला तरुण मुलगा बाहेर येतो. हातात ‘द हिंदू’ वृत्तपत्र असते. कदाचित सिव्हिल सव्‍‌र्हिसेसची तयारी करीत असावा. माजी आयआरएस असलेल्या या नेत्याला शुभेच्छा देतो. बायाबापडय़ांना कौतुक वाटते. ‘पहले वोट डालना; उसके बाद टीव्ही देखना, किसी के बहकावे में ना आना पहले वोट डालना, इसबार पूर्ण बहुमत कि सरकार’ सूचना संपतात. नेता पुढच्या मतदारसंघाकडे कूच करतो. ‘सर्व्हट क्वार्टर्स’मध्ये कुणाही पक्षाचे चिन्ह पोहोचलेले नसते. कुणाचीही पर्ची (वोटर स्लिप) आलेली नसते. मतदानाच्या दिवशी प्रमुख पक्षांनी काहीतरी पोहोचवण्याचे आश्वासन दिले असते. ‘मद्य’रात्रीतून राजकारण बदलू शकते. म्हणून या भागासाठी नेमलेल्या कार्यकर्त्यांकडे ‘स्पाय कॅमेरा’ पोहोचला कि नाही, याची खात्री जाता-जाता हा नेता करतो. नेता गेल्यानंतर कार्यकर्त्यांचे काम सुरू होतो. ‘घर-घर’चलो अभियानाचे. त्यासाठी डझनभर स्वयंसेवक जमलेले असतात.  
चाटवाला