दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या वतीने (आप) विधानसभेत जनलोकपाल विधेयक ज्या पद्धतीने मंजुरीसाठी मांडण्यात आले त्याला काँग्रेस आणि भाजपने विरोध दर्शविला आहे. विधेयक मांडण्यासठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा, असे या दोन्ही पक्षांनी म्हटले आहे.
देशातून भ्रष्टाचार हद्दपार व्हावा यासाठी जी पावले उचलण्याची गरज आहे त्याला आमचा विरोध नाही, मात्र दिल्लीचे विधिमंत्री सोमनाथ भारती यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या वेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने पळ काढला त्याबद्दल काँग्रेस आणि भाजपने त्यांना लक्ष्य केले.
आम्ही जनलोकपाल विधेयकाच्या विरोधात नाही. जनलोकपाल कायदा त्यांना आणावयाचा असल्यास त्यांनी योग्य पद्धतीने विधेयक आणावे. जे विधेयक प्रचलित पद्धतीने आणले जाईल, त्या विधेयकाला आमचा पाठिंबा राहील, असे दिल्लीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंदरसिंग लवली यांनी म्हटले आहे.
आपने योग्य पद्धतीने जनलोकपाल आणल्यास काँग्रेस त्याला पाठिंबा देईल, मात्र केजरीवाल यांनी ज्या पद्धतीचा अवलंब केला आहे त्याला आमचा विरोध आहे, असेही लवली म्हणाले. भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर हे सरकार पळ काढण्याची भूमिका घेत आहे, मात्र आम्ही सोमनाथ भारती यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा प्रश्न लावून धरणार आहोत, प्रसंगी त्यासाठी रस्त्यावरही उतरू, असेही ते म्हणाले.