दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या घशावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांना तब्बल पंधरा दिवस दिल्लीपासून दूर राहावे लागणार आहे. केजरीवाल यांना ‘क्रोनिक कफ प्रॉब्लेम’ ही व्याधी असून येत्या १३ तारखेला बेंगळुरू येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यानंतर केजरीवाल १० दिवस विश्रांती घेतील. या दरम्यान ते राजकारणापासून पूर्णपणे लांब राहणार असल्याचे समजते. २२ सप्टेंबरपासून केजरीवाल पुन्हा कार्यरत होणार आहेत. या काळात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया दिल्लीच्या कारभाराची सूत्रे सांभाळतील, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली. यापूर्वी केजरीवाल यांनी बेंगळुरू येथील जिंदाल नेचर केअर संस्थेत केजरीवाल यांनी नेचरोपथी उपचार घेतले होते. याशिवाय, हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील ध्यानधारणा केंद्रामध्ये दहा दिवसीय विपश्यना शिबिरातही त्यांनी सहभाग घेतला होता.