दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात सुरू असलेला वाद आता शिगेला पोहचला असून बुधवारी याप्रकरणी केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून आपला रोष व्यक्त केला. मोदींना लिहलेल्या या पत्रात केजरीवलांनी दिल्ली सरकारला स्वतंत्रपणे त्यांचा कारभार करु द्यावा, असे लिहले आहे. याशिवाय, केंद्र सरकार राज्यपालांच्या माध्यमातून दिल्लीचे सरकार चालवू पाहत असल्याचा थेट आरोपही या पत्रामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता या संपूर्ण वादाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी जंग यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत केजरीवाल यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यातील २० आयएएस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी केंद्र सरकारकडे विनंतीही केली होती.  
दिल्ली प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यावरून या वादाला सुरूवात झाली होती. गेल्या काही दिवसांत दोन्ही बाजुंकडून एकमेकांच्या अधिकारकक्षेचे उल्लंघन करण्यात आल्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यानंतर मंगळवारी हा वाद थेट राष्ट्रपती भवनापर्यंत जाऊन पोहचला होता. सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती किंवा बदली करण्याचा मला अधिकार आहे. त्यामुळे माझी कोणतीही कृती घटनाबाह्य नसल्याचा जंग यांचा दावा आहे. मात्र आम आदमी पक्षाला जंग यांचा हा दावा मान्य नाही. काही दिवसांपूर्वी नजीब जंग यांनी स्वत:च्या अधिकारात शकुंतला गैमलिन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. त्यावर गैमलिन यांचे वीज कंपन्यांशी साटेलोटे असल्याचा आरोप करीत केजरीवाल यांनी जंग यांच्यावर जाहीर टीका केली होती. मात्र, राज्य मंत्रिमंडळाशी चर्चा न करता निर्णय घेण्याचे अधिकार नायब राज्यपालांना असल्याचे सांगत गृह राज्यमंत्री किरिन रिजिजू यांनी राज्य सरकारचा निर्णय चुकीचा ठरवला होता. राजनाथ सिंह यांनी नियुक्त केलेले प्रधान सचिव आनंदो मुजुमदार यांच्या कार्यालयास राज्य सरकारने कुलूप लावून त्यांच्या जागी राजेंद्र कुमार यांची नियुक्ती केली. त्यानंतर केजरीवाल यांनी परिपत्रक काढून नायब राज्यपालांचे आदेश न मानण्याची सूचना राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना केली. अवघ्या दोन तासांमध्ये नजीब जंग यांनी राजेंद्र कुमार यांची नियुक्ती रद्द केली होती. केजरीवाल व नजीब जंग यांच्या मतभेदांमुळे गेल्या तीन दिवसांमध्ये तीन अधिकाऱ्यांची चार वेळा बदली करण्यात आली आहे.