जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी गुरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी सामन्याला हिंसक वळण लागल्याचा प्रकार घडला. चमार आणि वाल्मिकी या दलित जातीतील खेळाडुंचा समावेश असलेला संघ सामन्यात वरचढ ठरू लागल्यामुळे हा प्रकार घडला. गुरगावच्या चक्करपूर गावात ही घटना घडली. प्रतिस्पर्धी यादव संघाकडून यावेळी दलित खेळाडुंना धमकावण्यात आणि मारहाण करण्यात आली. पोलीस घटनास्थळी येण्यापूर्वी येथील काही लोकांनी या दलित खेळाडुंना देशी कट्ट्यांचा धाक दाखवून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या मारहाणीच्या घटनेत तब्बल १० जण जखमी झाले असून यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींपैकी योगेंदरच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून  विजेंदरच्या डोक्याला खूप मार लागला आहे. सर्व जखमींवर गुरगावच्या उमा संजीवनी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हवे तर मला गोळया घाला, पण दलितांवरील हल्ले थांबवा: पंतप्रधान मोदी
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी यादव समाजाच्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दलित, यादव, जाट, गुर्जर, बनिया आणि अग्रवाल अशा विविध जातींच्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यापैकी यादवांचा संघ सिंकदरापूरमधून आला होता. मात्र, या संघात स्थानिक गावातील अनेकजणांचा समावेश होता. हा सामना दलित संघ जिंकेल असे वाटायला लागल्यानंतर गावातील यादव समाजाचे लोक संतप्त झाले आणि त्यांनी इतरांच्या साथीने आम्हाला मारहाण केली, अशी माहिती दलित संघातील खेळाडू बिट्टो सिंग याने दिली. त्यांनी आमच्या खेळाडुंना मारले, ज्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही मारहाण झाली, असे बिट्टो सिंगने सांगितले. मात्र, यादव संघाकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. काही तरूण जोशात आल्यामुळे हा प्रकार घडला. मात्र, आता या सगळ्याला जाणुनबुजून जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे, असे यादव संघाकडून सांगण्यात आले.