राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका गावात करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नियमांचे पालन न करता अंत्यसंस्कार करणे गावकऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. अंत्यसंस्कारानंतर गावात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. २१ एप्रिल रोजी करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव खीरवा गावात आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्यावर अंत्यसंस्कारासाठी १५० लोक सहभागी झाले होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

राजस्थानच्या खीरवा गावात एका व्यक्तीचा करोनामुळे २१ एप्रिलला मृत्यू झाला होता. त्यानंतर १५० लोकांनी त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सहभागी झाले होते. अंत्यसंस्कारावेळी करोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावकऱ्यांनी मृत व्यक्तीचे पार्थिव प्लास्टिक बाहेर काढले होते. तसेच त्याला अनेकांनी स्पर्श देखील केला होता. त्यानंतर १५ एप्रिल ते ५ मे पर्यंत गावामध्ये २१ जणांनी आपले प्राण गमवाले आहेत. त्यातील ३ ते ४ मृत्यू हे करोनामुळे झाले असल्याची माहिती लक्ष्मणनगरचे उप-विभागीय अधिकारी कुलराज मीना यांनी दिली.

गावात झालेल्या २१ मृत्यूमंध्ये ३ ते ४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अधिकर वृद्ध आहेत. गावातील १४७ जणांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कुलराज मीना यांनी दिली आहे.

दरम्यान, खीरवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा यांनी या वृत्ताला दुजोरा देत “तीव्र दु:खाने मला सांगावे लागत आहे की, २० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत आणि बर्‍याच जणांना संसर्ग झाला आहे,” असे ट्विट केले होतं. मात्र नंतर त्यांनी ते काढून टाकलं.