स्वत:च्याच आश्रमातील गुरुकुलात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी आसाराम बापू यांना राजस्थान पोलिसांनी समन्स जारी केले आहे. त्यांना ३० ऑगस्टला किंवा तत्पूर्वी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आसारामांच्या छिंदवाडा येथील गुरुकुलाचे मुख्याधिकारी यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान, आसारामबापूंच्या समर्थकांनी समन्स स्वीकारताना बराच थयथयाट केल्याचे वृत्त असून आसारामबापू हे ‘ध्यानधारणा’ व ‘पूजे’त व्यग्र असल्याची सबब देत हे समन्स टाळण्याचाच त्यांनी प्रयत्न केला.
आसाराम यांनी बलात्कार केल्याची तक्रार त्यांच्या छिंदवाडा येथील गुरुकुलातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने जोधपूर पोलिसांत केली होती. मात्र, त्यानंतर बलात्काराचा आरोप मागे घेत लैंगिक शोषण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली. या तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर जोधपूर पोलिसांचे दोन जणांचे पथक मंगळवारी आसाराम बापूंच्या आश्रमात जाऊन त्यांना समन्स बजावले. मात्र, समन्स बजावण्यासाठी गेलेल्या या दोन्ही पोलिसांना आश्रमाबाहेर तब्बल सहा तास ताटकळत ठेवण्यात आले. आसाराम बापू ध्यानधारणा करत असून त्यात व्यत्यय न आणण्याचे बापूंचे आदेश आहेत, असे सांगत आश्रमातील कर्मचाऱ्यांनीच समन्स घेतले. प्रत्यक्षात आसाराम यांच्यापर्यंत पोलिसांना पोहोचू दिले नाही. आसाराम यांच्यावर बाल लैंगिक शोषणविरोधी कायदा व बाल न्याय कायदा याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आसाराम यांच्याबरोबरच छिंदवाडा गुरुकुलाचे मुख्याधिकाऱ्यांनाही समन्स जारी करण्यात आले आहेत, कारण हेच मुख्याधिकारी संबंधित मुलीला जोधपूर आश्रमात घेऊन गेले होते व जेव्हा गुन्हा झाला त्या वेळी ते घटनास्थळी उपस्थित होते. आसाराम यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचे स्पष्ट केले आहे.
आसारामांवर कारवाई करा
आसाराम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केली आहे. मुली-महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशा भोंदू बाबांना शिक्षा होणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करत राजस्थान सरकारने आसाराम यांना मोकळे सोडू नये असे आवाहन मायावती यांनी केले तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही आसाराम यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. आसाराम स्वत:ला निर्दोष मानत असतील तर त्यांनी पोलिसांसमोर हजर राहून प्रकरणाच्या तपासात सहकार्य करावे, असे दिग्विजय म्हणाले.
इमिग्रेशनकडे मागणी
आसाराम यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची नोटीस इमिग्रेशन विभागाने जारी करावी, अशी मागणी जोधपूर पोलिसांनी केली आहे. इमिग्रेशन विभागाच्या सहसंचालकांना आसाराम यांच्याविरोधात ‘लूक-आऊट’ नोटीस जारी करण्याची मागणी आपण केली असल्याचे जोधपूरचे पोलीस उपायुक्त अजय लाम्बा यांनी सांगितले.
गेहलोत यांचा इन्कार
जोधपूर पोलीस आसाराम यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याच्या आरोपाचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी इन्कार केला आहे. आसाराम यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याचे सर्वाधिकार पोलिसांना असून, त्यांच्या कामात आपले सरकार हस्तक्षेप करणार नसल्याचे गेहलोत यांनी दिल्लीत स्पष्ट केले.
आसारामबापू यांना जोधपूर पोलिसांचे ‘आवतण’ 
‘एक साधू जो तमाशा करतोय, त्यावर कोणीच का बोलत नाही?’
उमा भारती म्हणतात, आसाराम बापू निर्दोष