स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूविरोधात जोधपूरमधील न्यायालयाने निकाल दिला. २०१३ मध्ये जोधपूरमधील आश्रमात १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला न्यायालयाने दोषी ठरवले. निकालाच्या पार्श्वभूमीवर हरयाणा, राजस्थान आणि गुजरात या तीन राज्यांमधील पोलिसांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, हे प्रकरण नेमके काय आणि गेल्या पाच वर्षांत आसाराम बापू हा स्वयंघोषित गुरु खलनायक कसा ठरला याचा घेतलेला हा आढावा….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बलात्काराचे प्रकरण काय?
उत्तर प्रदेशमधील मुलीने २०१३ मध्ये आसारामबापूविरोधात बलात्काराची तक्रार दिली. उत्तरप्रदेशमधील शहाजहाँपूरमधील पीडित मुलगी शाळेत भोवळ येऊन पडली होती. यानंतर तिला आसारामबापूच्या आश्रमात नेण्यात आले. तिच्यावर काळी जादू झाली असून तिला काही दिवस आश्रमात ठेवावे, असे तिच्या पालकांना सांगण्यात आले. १५ ऑगस्ट २०१३ रोजी आसाराम बापूने आश्रमात बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला होता.

आसारामला अटक
बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या आठवडाभरानंतर आसारामबापूला अटक करण्यात आली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी आसारामबापूला अटक होईपर्यंत आमरण उपोषण केले होते. प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरल्याने आसारामबापूच्या अटकेसाठी दबाव वाढत होता. अखेर ३१ ऑगस्ट रोजी इंदूरजवळील छिंदवाडा येथील आश्रमात जोधपूर पोलिसांचे पथक पोहोचले. मात्र, आसारामच्या समर्थकांनी आश्रमाबाहेरच पोलिसांना रोखून ठेवले. आसाराम बापूची प्रकृती चांगली नसल्याचे कारणही पोलिसांना देण्यात आले. जवळपास आठ तास पोलिसांना आश्रम परिसरात ताटकळत ठेवण्यात आले होते. पोलिसांनी इंदूरमधील वैद्यकीय महाविद्यालयाचा अहवाल दिल्याने आसारामबापूच्या समर्थकांचा नाईलाज झाला. अखेर मध्यरात्री उशिरा आसारामबापूला अटक करण्यात आली. यानंतर १ सप्टेंबर रोजी आसारामबापूला विमानाने दिल्ली मार्गे जोधपूरला नेण्यात आले. आसारामबापूच्या अटकेनंतर त्याच्या समर्थकांनी देशभरात निदर्शने आणि रेलरोकोच्या माध्यमातून थयथयाट केला होता.

अटकेच्या दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल
१६ वर्षांच्या मुलीवरील बलात्काराप्रकरणी पोलिसांनी ९ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले. सुमारे हजारभर पानी आरोपपत्रात पोलिसांनी आसारामविरोधात बलात्कार (कलम ३७६), जिवे ठार मारण्याची धमकी (कलम ५०६), महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव किंवा कृती करणे (कलम ५०९) अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. पॉस्को अॅक्टचाही यात समावेश होता.  आरोपपत्रात १२१ दस्तावेज तसेच ५८ जणांच्या जबानीचा समावेश होता. या प्रकरणात शिल्पी, शिवा, प्रकाश आणि शरदचंद्र हे सहआरोपी आहेत.

वाचा सविस्तर: आसाराम बापू बलात्कारीच

साक्षीदारांची हत्या
बलात्कार प्रकरणात २०१४ पासून न्यायालयात सुनावणी सुरु झाली. मात्र, सुनावणी सुरु होताच आसारामबापूच्या समर्थकांनी साक्षीदारांना लक्ष्य करायला सुरुवात केली. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि आसाराम बापूचा सेवक अमृत प्रजापती यांच्यावर २३ मे २०१४ मध्ये राजकोटमध्ये गोळीबार करण्यात आला.यात गंभीर जखमी झालेल्या प्रजापती यांचा १५ दिवसांनी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आयुर्वेद डॉक्टर असलेले प्रजापती गेली अनेक वर्षे आसाराम बापू यांच्या आश्रमात काम करत होते. आसाराम बापूंना लहान मुलांसमवेत आक्षेपार्ह अवस्थेत बघणारे प्रजापती या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. २००५ मध्ये त्यांना आश्रमातून काढून टाकण्यात आले होते. तेव्हापासून त्यांनी आसाराम बापू यांच्याविरोधात रण पेटवले होते. अध्यात्माच्या नावावर आसाराम बापू व त्यांचा मुलगा नारायण साई हे दोघे अनेक छुपे कारनामे करत असल्याचा आरोप करून त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. महिलांशी गैरवर्तन, जडीबुटीच्या नावावर अंमली पदार्थाचे सेवन, रतलाममधील आश्रमात अफूची शेती अशा प्रकारचे गंभीर आरोप त्यांनी आसाराम बापू यांच्यावर केले होते. आणखी एका बलात्कार प्रकरणात आसारामबापूविरोधात साक्ष देणारे अखिल गुप्ता (वय ३५) यांची देखील ११ जानेवारी २०१५ रोजी हत्या करण्यात आली होते. अखिल गुप्ता हे आसाराम बापूचे माजी खानसामा व सहकारी होते. याशिवाय राहुल सचान हा साक्षीदारही बेपत्ता झाला होता. तर नारायण साई आणि आसारामबापूविरोधातील बलात्कार प्रकरणातील साक्षीदार महेंद्र चावला यांच्यावरही मे २०१५ गोळीबार करण्यात आला होता. बलात्कार प्रकरणात आसारामबापूंविरोधात साक्ष देणाऱ्या तीन जणांची हत्या करण्यात आली. तर ४ जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaram bapu rape case verdict jodhpur court violence witness killings what happened in last 5 years
First published on: 25-04-2018 at 09:44 IST