स्वयंघोषित संत आसाराम बापू शुक्रवारपर्यंत जोधपूर पोलिसांपुढे हजर झाले नाहीत, तर त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. आसाराम बापूंविरोधात एका मुलीने शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ३० ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारपर्यंत चौकशीसाठी जोधपूर पोलिसांपुढे हजर होण्याचे समन्स बजावले आहे. आसाराम बापूंच्या अहमदाबादमधील आश्रमात हे समन्स पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर राजस्थानमधील पोलिसांनी सूरतमध्येही समन्स दिले आहे.
आसाराम बापूंना दिलेल्या समन्समध्ये शुक्रवारपर्यंत हजर होण्याची सूचना देण्यात आली आहे. तोपर्यंत आम्ही वाट पाहू. जर ते शुक्रवारपर्यंत पोलिसांपुढे हजर झाले नाहीत. तर त्यांना अटक करण्यासाठी ३१ ऑगस्टला पोलिसांचे पथक पाठविण्यात येईल, असे जोधपूरचे पोलिस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले.
आपले पूर्वनियोजित धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे चौकशीसाठी हजर होण्याला १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आसाराम बापू यांनी पोलिसांकडे केली आहे. मात्र, आसाराम बापू यांना चौकशीसाठी कोणतीही मुदतवाढ न देण्याचा निर्णय़ पोलिसांनी घेतल्याचे समजते.