लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेले स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू प्रकरणातील मुख्य साक्षीदार अमृत प्रजापती यांचा मंगळवारी अहमदाबादमधील रुग्णालयात मृत्यू झाला. आसाराम बापू यांचे सेवक असलेल्या प्रजापती यांच्यावर २३ मे रोजी राजकोट येथे अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता.
आयुर्वेद डॉक्टर असलेले प्रजापती गेली अनेक वष्रे आसाराम बापू यांच्या आश्रमात काम करीत होते. आसाराम बापूंना लहान मुलांसमवेत आक्षेपार्ह अवस्थेत बघणारे प्रजापती या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. २००५मध्ये त्यांना आश्रमातून काढून टाकण्यात आले होते. तेव्हापासून त्यांनी आसाराम बापू यांच्याविरोधात रण पेटविले होते. अध्यात्माच्या नावावर आसाराम बापू व त्यांचा मुलगा नारायण साई हे दोघे अनेक छुपे कारनामे करत असल्याचा आरोप करून त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. महिलांशी गैरवर्तन, जडीबुटीच्या नावावर अंमली पदार्थाचे सेवन, रतलाममधील आश्रमात अफीमची शेती अशा प्रकारचे गंभीर आरोप त्यांनी आसाराम बापू यांच्यावर केले होते.
राजकोट येथे त्यांच्यावर २३ मे रोजी गोळीबार करण्यात आल्यानंतर गेली १५ दिवस ते अहमदाबादमध्ये उपचार घेत होते. मात्र शरीर उपचाराला साथ देत नसल्याने मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. ‘‘गोळीबार झाल्यानंतर प्रजापती यांनी पाच संशयितांची नावे पोलिसांना दिली होती. या हल्ल्यामागे हेच लोक असल्याचा संशय व्यक्त करून त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि पत्तेही देण्यात आले होते. मात्र राजकोट पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही,’’ असे प्रजापती यांचे मामा मोती प्रजापती यांनी सांगितले. प्रजापती यांच्यावर तब्बल सात वेळा हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना पुरेशी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात पोलिसांनी असमर्थता दर्शविली होती.

माझ्या पतीच्या हत्येमागे आसाराम बापू यांचाच हात आहे. प्रजापती यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असे आम्ही वारंवार पोलिसांना सांगितले होते. मात्र त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. स्थानिक पोलिसांवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे माझ्या पतीच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
सरोज प्रजापती

गुजरात सरकारवर विरोधकांची झोड

आधी महिला पाळत प्रकरण आणि आता आसाराम बापू प्रकरण, दोन्ही प्रकरणांमध्ये गुजरात सरकारकडून कायदा आणि सुव्यवस्थेची पायमल्ली केली जात आहे. जेथे साक्षीदारांवरच हल्ले होतात, त्यांना ठार मारले जाते, तिथे इतरांचे काय, असा सवाल काँग्रेसतर्फे उपस्थित केला जात आहे. गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते शंकरसिंघ वाघेला यांनी राज्यात कायद्याचे वर्चस्व राहीले नसल्याचे म्हटले आहे. काही आठवडय़ांपूर्वी येथे व्यापाऱ्यांच्या हत्या झाल्याआहेत. त्यांची तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.