24 February 2021

News Flash

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ शब्दावर अशोक चव्हाणांनी नोंदवला आक्षेप, म्हणाले…

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यसभेत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधल्याचे दिसून आले.

संग्रहित छायाचित्र

केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनाच्या आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विरोधक या मुद्य्यावरून केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत विरोधकांसह या आंदोलनास पाठिंबा दर्शवणाऱ्यांवर जोरदार टीका केली. देशात नवी आंदोलनजीवी जमात उदयाला आली आहे, जनतेनं त्यांच्यापासून सावध रहावं, असं मोदींनी म्हटलं आहे. तर, पंतप्रधान मोदींनी वापरलेल्या ‘आंदोलनजीवी’ या शब्दावर काँग्रेस नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आक्षेप नोंदवत ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

“पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही. या शब्दातून आंदोलनावर जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही ‘जीवी’ नाही, तर मानवतेला ‘जीवि’त ठेवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे.” असं म्हणत अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शवणाऱ्या आणि आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या नेत्यांवर, राजकीय पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते.

देशात नव्या ‘आंदोलनजीवी’ जमातीचा उदय, जनतेनं त्यांच्यापासून सावध रहावं – पंतप्रधान

“श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. मात्र, मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे ‘आंदोलनजीवी’. वकिलांचं, विद्यार्थ्यांचं, कामगारांचं कुणाचंही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जगू शकत नाहीत, तसेच आंदोलनासोबत जगण्यासाठी ते मार्ग शोधत असतात, आपल्याला अशा लोकाना ओळखायला हवं” असं पंतप्रधान मोदींनी म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 7:11 pm

Web Title: ashok chavan objects to pm modis that word says msr 87
Next Stories
1 गाडीची कागदपत्रं मागणाऱ्या पोलिसाला तरुणांकडून बेदम मारहाण; मुलांना घरातून उचलून नेण्याची दिली धमकी
2 करोनाबाधित गृहमंत्र्यांना आठवलेंनी दिला आपल्या खास शैलीत काळजी घेण्याचा सल्ला
3 पंतप्रधान मोदींनी केलं ज्योतिरादित्य शिंदेचं कौतुक; म्हणाले…
Just Now!
X