राजस्थानातील सत्ता संघर्ष देशातील महत्त्वाच्या विषयांपैकी एक बनला आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील मतभेद उफाळून आल्यानंतर मोठ राजकीय नाट्य उभं राहिलं. सध्या हा राजकीय संघर्ष न्यायालयात पोहोचला असून, काँग्रेसला अद्यापही दिलासा मिळालालेला नाही. गेहलोत-पायलट यांच्यातील संघर्ष मिटण्याची शक्यता कमी असतानाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना सरकारमध्ये संधी देण्याची ऑफर दिली आहे.

आणखी वाचा- “देशात याआधी असा ‘नंगा नाच’ कधी पाहिलेला नाही”, अशोक गेहलोत यांची टीका

राजस्थानातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत यांची इंडियन एक्स्प्रेसनं मुलाखत घेतली आहे. या मुलाखती दरम्यान विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना गेहलोत यांनी पायलट यांचं पुन्हा स्वागत करू असं म्हटलं आहे. राजस्थानमधील संकटाने तुमच्या सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, हे सरकार किती स्थिर आहे, असा प्रश्न गेहलोत यांना विचारण्यात आला. उत्तर देताना गेहलोत म्हणाले,”राज्य सरकारच्या कोणत्याही कामामुळे हे संकट निर्माण झालेलं नाही. हे राजकीय संकट अतिमहत्त्वकांक्षी असलेल्या सचिन पायलट व पक्षातील आमदारांच्या छोट्या गटानं जे भाजपाच्या हातातील बाहुले बनले आहेत, त्यांनी उभं केलं आहे. राजस्थानातील काँग्रेस सरकारकडे पुरेस बहुमत आहे. लोकांच्या पाठिंब्याचाही आम्हाला आनंद आहे. आमचं सरकार पूर्णपणे स्थिर असून, कालावधी पूर्ण करेल,” असं गेहलोत म्हणाले.

आणखी वाचा- “भाजपानं संविधानाची सर्कस केली, तर लोकशाहीला द्रौपदी”; काँग्रेसला संताप अनावर

“सचिन पायलट काँग्रेसमध्ये परतल्यास त्यांना सरकारमध्ये आणि राज्याच्या राजकारणात स्थान असेल का?”, या प्रश्नावर बोलताना अशोक गेहलोत म्हणाले,”हे सगळं भविष्यातील घडामोडींवर अवलंबून आहे. भविष्यात पायलट कोणता निर्णय घेतात आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्या काय ठरवते, यावर अवलंबून असेल. जर त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास टाकण्याचा निर्णय घेतला, तर मी त्यांचं स्वागत करेन,” असं सांगत गेहलोत यांनी अप्रत्यक्षरीत्या पायलट यांना परतण्याचे संकेत दिले आहेत.