स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीसाठी आयोग नेमण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी खासगी विधेयक मांडून लोकसभेत केली. खा. नेते यांनी आज, शुक्रवारी लोकसभेत चार  खासगी विधेयके मांडली. त्याविषयी माहिती देताना नेते म्हणाले की, १९३८ साली तत्कालीन मध्य प्रांताने महाविदर्भाच्या निर्मितीचा ठराव केला होता. त्यानंतर २९ डिसेंबर १९५३ साली आयोगाने स्वतंत्र विदर्भाच्या ठरावाला मंजुरी दिली होती. परंतु अद्याप विदर्भाची निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे आता बहुमतात असलेल्या भाजपप्रणीत रालोआ सरकारने विदर्भाची निर्मिती करावी.
खा. नेते यांनी ही आपली वैयक्तिक मागणी असल्याचे स्पष्ट केले. भाजपची अधिकृत भूमिका स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा देणारी असली तरी नेते यांनी त्यावर बोलण्याचे टाळले. विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र विदर्भाचे समर्थन केले होते, असा दावा त्यांनी केला. याखेरीज ‘ग्रामगीता’कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी खा. नेते यांनी लोकसभेत केली. विदर्भातील विकासकामांना गती देण्यासाठी वन कायद्यात सुधारणा करण्याची वा हा कायदा रद्द करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.