पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा उर्मट असल्याचा आरोप करत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रद्युत बोरा यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. ते पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे माजी राष्ट्रीय समन्वयक आहेत. पक्षातील लोकशाही मोदींची संपुष्टात आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर शहा हे उद्धट असल्याची कडवट टीका त्यांनी केली.
दरम्यान, भाजपने बोरा यांचे आरोप फेटाळले आहे. हे दोषारोप वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. ज्यांना काडीचाही जनाधार नाही अशा व्यक्तीने हे आरोप केल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. आसाममधील पक्षाच्या अनेक आमदार-खासदारांवर काँग्रेसचे नियंत्रण असल्याचा आरोप वोरा यांनी केला. भाजपमध्ये एकाधिकारशाही असल्याने मोदींना कुणीही प्रश्न विचारू शकत नाही अशी टीका त्यांनी केली आहे. पंतप्रधान हा समाजातील पहिला असतो, मात्र हे तत्त्व मोदींनी धाब्यावर बसवल्याचा आरोप बोरा यांनी केला. सध्याच्या परराष्ट्रमंत्र्यांना परराष्ट्र सचिवांचे नावही माहीत नसेल इतके मोदींनी सत्तेचे केंद्रीकरण केल्याची टीका राजीनामा देताना बोरा यांनी केली आहे.