आसामच्या धेमाजी जिल्ह्यात माणुसकीला लाजवेल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विकृताने अल्पवयीन मुलीच्या मृतदेहासोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. आसाम पोलिसांनी या ५० वर्षीय विकृत आरोपीला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी या मुलीचा रहस्यमयी मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी नदीकाठी मृतदेहाचे दफन केले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आसामच्या धेमाजी जिल्ह्यातंर्गत येणाऱ्या सीलापाथर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मागच्या आठवडयात १७ मे रोजी रात्री या मुलीचे निधन झाल्यानंतर धेमगावात नदीकाठी कुटुंबीयांनी तिच्या मृतदेहाने दफन केले. १८ मे रोजी दुपारी विकृताने नदीकाठी दफन केलेला मृतदेह बाहेर काढला व तो शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तिथे असलेल्या स्थानिक मच्छीमारांनी त्याला पाहिले. त्यांनी या विकृताला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.

शरीरसंबंध ठेवण्यासाठी आपण दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. आसाम पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ३०६, ३७७ आणि पॉस्को कायद्याच्या कलम आठ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. धेमाजी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली.

कोर्टाच्या निर्देशावरुन आरोपीची अलीकडेच तुरुंगातून सुटका झाली होती. करोना व्हायरसच्या साथीमुळे आरोपी तुरुंगातून सुटला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. “आरोपी मनोरुग्ण नाहीय. २०१८ साली पत्नीने नोंदवलेल्या एफआयआर वरुन त्याला अटक करण्यात आली होती. पत्नीने तक्रार नोंदवल्यानंतर तो फरार होता. पोलिसांनी सप्टेंबर २०१९ मध्ये त्याला अटक केली होती” अशी माहिती डीएसपी प्रदीप कोनवार यांनी दिली.