भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान २ या महत्त्वाकांक्षी अवकाशयानाचे उड्डाण बघण्यासाठी जमलेल्या हजारो लोकांच्या उत्साहावर हे उड्डाण तांत्रिक बिघाडाने रद्द करण्यात आल्याने विरजण पडले.

सोमवारी पहाटे २.५१ वाजता चांद्रयान २ हे जीएसएलव्ही मार्क३ या प्रक्षेपकाच्या मदतीने अवकाशात झेपावणार होते. मात्र, ५६ मिनिटे २४ सेकंद आधीच त्यातील तांत्रिक बिघाड लक्षात आला.

सतीश धवन अवकाश केंद्राच्या प्रेक्षा गॅलरीत हे उड्डाण ‘याचि डोळा’ अनुभवण्यासाठी उत्साही खगोलप्रेमी जमले होते, त्यात विद्यार्थी,तरुण यांचा समावेश होता. अनेक जण दुचाकीवर प्रवास करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आले होते.उड्डाणाची घटिका समीप येत असताना उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती, अशातच पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी अचानक सगळे काही थांबल्यासारखे झाले. उपस्थितांना त्यामुळे गोंधळल्यासारखे झाले. नंतर इस्रोने हे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द केल्याचे जाहीर करतानाच पुढील तारीख लवकरच ठरवली जाईल असेही स्पष्ट केले. उड्डाण रद्द झाल्याने उपस्थित खगोलप्रेमी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची निराशा झाली. जर चांद्रयान २ मोहीम यशस्वी झाली तर भारत हा चंद्रावर यान उतरवणारा रशिया, अमेरिका, चीन यांच्यानंतरचा चौथा देश ठरणार आहे.

इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी अलीकडेच श्रीहरिकोटा येथे प्रेक्षागॅलरीचे उद्घाटन केले होते, त्यामुळे या वेळी हे उड्डाण पाहण्यासाठी तेथे गर्दी झाली होती. ज्या लोकांना चांद्रयान २ उड्डाण पाहण्याची इच्छा आहे त्यांना नावनोंदणी करण्याची संधी गेल्या आठवडय़ात दिली होती.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उड्डाण पाहण्यासाठी उपस्थित होते. या वेळी कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. त्यात शिस्तबद्ध पद्धतीने लोकांना प्रेक्षागॅलरीत सोडण्यात येत होते. उड्डाण रद्द झाल्यानंतर लोक तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीने बाहेर पडले. एक मुलगा तिरंगा घेऊन कुटुंबीयांसमवेत आला होता, त्याने सांगितले,की उड्डाण रद्द झाल्याने आपण निराश झालो. काय झाले ते आम्हाला माहिती नाही पण उड्डाण रद्द झाले एवढे निश्चित. त्यामुळे वाईट वाटले. जो तांत्रिक बिघाड असेल तो दूर केला जाईल व आम्ही पुन्हा हे ऐतिहासिक उड्डाण पाहण्यासाठी येऊ. आणखी एका व्यक्तीने सांगितले,की वैज्ञानिकांनी हे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला हे चांगलेच झाले, कारण हे यान उड्डाणानंतर कोसळले असते तर पैसा व श्रम दोन्ही वाया गेले असते.