आंध्र प्रदेशात कृष्णा नदीमध्ये बोट उलटल्याने १६ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने यासंदर्भातली बातमी दिली आहे. विजयवाडातील इब्राहिमपट्टणम मंडल भागात ही घटना घडली आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती आंध्र प्रदेशचे गृहमंत्री एन चिन्नराजप्पा यांनी ही माहिती दिली आहे. कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या लोकांच्या डोळ्यादेखत ही बोट बुडाली. या बोटीमध्ये किती लोक बसले होते हे अद्याप समजू शकलेले नाही. सुरुवातीला या घटनेतले ११  मृतदेह मिळाले असून २० जणांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले आहे. असेही चिन्नराजप्पा यांनी सांगितले.

भवानी बंदरापासून विजयवाडा जवळच्या पवित्र संगम या ठिकाणी बोट चालली होती. त्याचवेळी विजयवाडाजवळ ही बोट अचानक उलटली. या बोटीत ‘ओंगोले वॉकर्स क्लब’चे सदस्य होते.  ज्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले त्यांनी बोटीत ३८ लोक बसल्याची माहिती दिली आहे. बोटीत बसलेल्या एकाही प्रवाशाने लाईफ जॅकेट घातले नव्हते. सुरक्षेबाबतचे निकष पाळले गेले नाहीत असेही आता सांगितले जाते आहे. दरम्यान सध्या या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. एनडीआरएफच्या पथकालाही या ठिकाणी पाचारण करण्यात आले आहे.