स्थलांतरितांना वाहून नेणारी एक संशयित बोट बुडाल्यानंतर पूर्व एजियन भागात एका ग्रीक बेटाजवळच्या समुद्रातून १४ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याचे ग्रीसच्या तटरक्षक दलाने शनिवारी सांगितले. बेपत्ता असल्याचा संशय असलेल्या आणखी चारजणांच्या शोधासाठी व्यापक शोध व बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे.सामोस बेटाच्या दक्षिणेकडे असलेल्या अगातोनिसी बेटापासून काही अंतरावर सुरुवातीला ४ मुले, १ पुरुष व १ महिला असे चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर काही वेळातच आणखी ८ मृतदेह सापडले. दोन महिला व एक पुरुष असे तिघेजण किनाऱ्यावर पोहचण्यात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती दिली. सुमारे २१ लोकांना वाहून नेणारी लाकडी बोट बुडाल्याचे या लोकांनी अधिकाऱ्यांना सांगितले.