तुर्कस्तानातून युरोपात प्रवेश करण्याची धडपड करणाऱ्या आठहून अधिक निर्वासितांचा ग्रीसच्या कोस बेटांनजीक भूमध्य समुद्रात बोट बुडून मृत्यू झाला. ‘आयसिस’च्या जुलमी वरवंटय़ाखाली पिचून निघालेल्या इराक, सीरिया व अफगाणिस्तानमधील लाखो नागरिक भूमध्य समुद्रमार्गे युरोपात पोहोचण्याची धडपड करत आहेत. त्यापैकी ३५००हून अधिक जण युरोप गाठण्यापूर्वीच बुडून मरण पावले आहेत.
ग्रीसच्या तटरक्षक दलाला सहा मृतदेह सापडले असून, आणखी दोघे जण जलसमाधी मिळालेल्या बोटीत आढळले. या अपघातातून सात निर्वासित वाचले असून, त्यांनी आणखी पाच जण बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तुर्कस्तानातून निघालेली ही बोट मध्यरात्री बुडाली. समुद्रात गस्त घालणाऱ्या एका फिनिशियन जहाजातील जवानांना ही बोट आढळली. हे जहाज ‘फ्रंटेक्स’ या युरोपीय समुदायाच्या सीमेवर गस्त घालण्याची जबाबदारी असणाऱ्या संस्थेच्या मोहिमेत सहभागी झाले होते. सीरिया, इराक व अफगाणिस्तानातील यादवीला कंटाळून आजपावेतो आठ लाखांहून अधिक निर्वासितांनी भूमध्य समुद्रमार्गे युरोप गाठला आहे. त्यापैकी बहुतांश जण ग्रीकच्या किनाऱ्यावर उतरून बाल्कन राष्ट्रे गाठतात व तिथून पुढे जर्मनी व स्वीडनसारख्या देशांमध्ये आश्रयासाठी अर्ज करतात. युरोपात दाखल होणाऱ्या निर्वासितांच्या लोंढय़ांवर कठोर नियंत्रण आणावे, या मागणीसाठी ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सी त्सापिरास तुर्कस्थानला भेट देणार आहेत. पॅरिस हल्ल्यांत सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याच्या सीरियन पासपोर्टवर ग्रीसच्या लेरोस बेटावर ३ ऑक्टोबर रोजी दाखल झाल्याचा शिक्का आहे. या पाश्र्वभूमीवर युरोपीय समुदायाकडून ग्रीसवर दबाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे अस्वस्थ झालेल्या त्सापिरास यांनी तुर्की राष्ट्रप्रमुखांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे.