उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्य़ात डेहराडून- वाराणसी जनता एक्सप्रेसचे डबे बचरावन येथे रूळावरून घसरल्याने किमान ३४  जण ठार झाले असून इतर १५० जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची  शक्यता नाकारता येत नाही, असे रेल्वेचे लखनौ विभागीय आयुक्त महेश गुप्ता यांनी सांगितले. सकाळी साडेनऊ वाजता लखनौपासून ५० कि.मी. अंतरावर बचरावन येथे हा अपघात झाला.
प्राथमिक वृत्तानुसार इंजिनाच्या चालकाने सिग्नल मोडला व त्यामुळे इंजिन व लगतचे दोन डबे रूळावरून घसरले, असे रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी सांगितले.
रेल्वेने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाइकांना २ लाख रूपये भरपाईची घोषणा केली आहे. गंभीर जखमींना ५० हजार रूपये, तर साधारण जखमींना २० हजार रूपये भरपाई देण्यात आली आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी  रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए.के.मित्तल व वाहतूक सदस्य अजय शुक्ला यांना घटनास्थळी पाठवले आहे. अपघाताचे वृत्त येताच आजूबाजूच्या खेडय़ातील लोक घटनास्थळी धावले व त्यांनी मदतकार्य केले. चेपलेल्या डब्यांमध्ये आणखी प्रवासी अडकल्याची भीती असून त्यातील एका डब्याची अवस्था फार वाईट आहे. डॉक्टरांना घेऊन काही रूग्णवाहिका तेथे गेल्या व  जखमींवर उपचार करण्यात आले. अपघातग्रस्त डबे कापून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. लखनौ-वाराणसी क्षेत्रात रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. जखमी प्रवाशांना लखनौ व रायबरेली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख, तर जखमींना ५० हजार रूपये भरपाई जाहीर केली आहे.
लखनौचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एसएनएस यादव यांनी सांगितले की, एकूण २४ वैद्यकीय पथके व निम्नवैद्यकीय कर्मचारी प्रथमोपचारासाठी पाठवण्यात आले. लखनौ येथे १५० खाटा रूग्णांसाठी राखीव ठेवल्या असून वैद्यकीय पथके त्यांच्यावर उपचार करीत आहेत.