लंडन येथे भूमिगत रेल्वे स्टेशनवर एका हल्लेखोराने तिघांना चाकूने भोसकले. हल्ला करताना त्याने सीरियातील कारवाईचा बदला घेण्यासाठी आपण हे कृत्य करीत आहोत असा आरडाओरडाही केला. नंतर त्याला कोठडीत टाकण्यात आले.
स्कॉटलंड यार्डच्या मते हा दहशतवादी घटनेचा भाग आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लेटोनस्टोन स्थानकावर काल सायंकाळी हा हल्ला करण्यात आला असून त्यात एका ५६ वर्षांच्या व्यक्तीने तिघांना भोसकले पण त्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या अंगावर चाकूच्या जखमा आहेत पण जीवाला धोका नाही. महानगर दहशतवाद विरोधी पथक या घटनेची चौकशी करीत आहे. टेसर या इलेक्ट्रॉनिक उपकरणाने पोलिसांनी संशयितास लगेच शोधून पकडले. सशस्त्र वाहनही लगेच घटनास्थळी पाठवण्यात आले. या घटनेच्या चित्रफितीत प्रवासी व मुले पळताना दिसत असून एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसत आहे. पोलिसांनी पहिल्यांदा टेसरचा वापर केला तेव्हा संशयित सापडला नाही पण दुसऱ्यांदा वापर करताच तो जमिनीवर कोसळला. कमांडर रिचर्ड वॉल्टन यांनी सांगितले की, हा दहशतवादाचा प्रकार आहे. लोकांनी शांतता पाळावी पण सतर्क रहावे. ज्यांनी कुणी या संशयिताला पाहिले होते त्यांनी आम्हाला दूरध्वनी करावा. हल्लेखोराकडे तीन इंची चाकू होता व तो जमिनीवर पडलेल्या व्यक्तीच्या अंगावर उभा होता. लोक पळत होते. मे २०१३ नंतर लंडनमधील हा पहिला दहशतवादी हल्ला आहे.