दिल्लीतील आपचे सरकार उलथवून टाकण्यासाठी भ्रष्ट आणि अभद्र युतीकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न केले जात असून पक्षाचे त्यांच्यावर बारकाईने लक्ष आहे, असे आपचे नेते सोमनाथ भारती यांनी म्हटले आहे.
आपच्या प्रयत्नांमुळे अभद्र युतीच्या कारवाया थंड पडल्या आहेत. त्यामुळे आता सदर युती खुलेआमपणे त्यांना शक्य असलेल्या कारवाया करीत आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सरकार उलथवून टाकण्याचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र आम्ही दक्ष आहोत, असेही भारती म्हणाले.
दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात मुळात संघर्ष नसून तो केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र सरकारसमवेत आहे.भाजप आता सरकारला अस्थिर करण्यासाठी प्रशासनाचा आधार घेत आहे, असेही भारती म्हणाले.
आरोप फेटाळले
पत्नीचा छळ केल्याचा आरोप असलेले आपचे माजी विधिमंत्री सोमनाथ भारती यांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांचे जोरदार खंडन केले आहे. सर्व आरोप असत्य आणि निराधार आहेत, असे ते म्हणाले. पत्नी आणि आपण गेल्या पाच वर्षांपासून स्वतंत्रपणे राहात असल्याने घरगुती हिंसाचाराचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भारती म्हणाले. आपली अथवा आईची निवड करावी, आप पक्ष आणि राजकारण सोडावे, अशा आपल्या पत्नीच्या मागण्या होत्या, असे भारती यांनी सांगितले.