आंध्रप्रदेशात एका ऑटो रिक्षा चालकाने डोक्यावर १५ लाख रुपयांचे कर्ज झाल्याने पत्नी आणि पोटच्या मुलीला विकायला काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या रिक्षा चालकाला चार मुली आणि एक मुलगा असून ही सर्व मुलं अल्पवयीन आहेत. आरोपी रिक्षा चालक ३८ वर्षांचा असून त्याने मुलीच्या विक्रीसाठी एका बाँडवर स्वाक्षरी केली होती.

मुलीने तारुण्यात पदार्पण केल्यानंतर तिला खरेदीदारांच्या ताब्यात सोपवण्याचा त्याने करार केला होता. सध्या ही मुलगी १२ वर्षांची आहे. दीड लाखामध्ये त्याने हा सौदा ठरवला होता. मुलगी वयात येईपर्यंत तिच्यावर कोणाची नजर पडणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याची अट खरेदीदाराने घातली होती असे आरोपीच्या पत्नीने सांगितले.

तिला अलीकडेच नवऱ्याच्या या कारस्थानाबद्दल समजले. आरोपी रिक्षा चालक मद्यपी असून तो पत्नीला सुद्धा त्याच्याच चुलत भावाला पाच लाख रुपयांना विकणार होता. त्यासाठी तो तिच्यावर बाँड साईन करायची जबरदस्ती करत होता. पतीच्या या वागण्याने हादरून गेलेली महिला मुलांना घेऊन नानद्याल येथे आई-वडिलांच्या घरी निघून आली त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. मुलांच्या सुरक्षिततेसाठी ही महिला मुलांना तिच्या आई-वडिलांच्या घरी घेऊन आली पण नवरा तिथेही पोहोचला आणि त्याने त्रास देणे चालूच ठेवले असे महिलेने सांगितले. या प्रकरणात तपास केल्यानंतर गुन्हा दाखल होईल असे पोलिसांनी सांगितले.

हा प्रकार समजल्यानंतर महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून मुलींना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मुलांच्या हिताला कुठल्याही प्रकारे बाधा येणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.