श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि त्यातून उदभवणाऱ्या आपत्कालीन प्रसंगांची मालिका सुरूच असून, शनिवारी सकाळी नियंत्रण रेषेजवळ माचिल भागात हिम्सखलनामुळे लष्कराचे पाच जवान बर्फाखाली अडकले. या जवानांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, माचिल भागातील लष्कराच्या एका तळाजवळ हिम्सखलनाची घटना घडली. शनिवारी सकाळी घडलेल्या घटनेत लष्कराचे पाच जवान बर्फाखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. बचावपथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टीमुळे हिम्सखलनाच्या घटनांमुळे बुधवारपासून आतापर्यंत २१ जणांना प्राणांना मुकावे लागले आहे. यामध्ये १५ सैनिकांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत काश्मीरमधील डोंगराळ भागात या स्वरुपाच्या आणखी काही घटना घडण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरमधील गुरेझमध्ये बुधवारी दोनवेळा हिमस्खलन झाले. हिमस्खलनाची दुसरी घटना घडली, त्यावेळी या भागातून पहारा देणारे जवान लष्करी तळाकडे निघाले होते. हिमस्खलन झाल्याने काही जवान बर्फाखाली अडकले आहेत. त्यांच्या शोधासाठी मदतकार्य लष्कराने मदतकार्य सुरू ठेवले आहे. बुधवारी गांदेरबाल जिल्ह्यातील सोनमर्गमध्ये हिमस्खलनाची घटना घडली होती. या हिमस्खलनात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता, तर चार जवान जखमी झाले होते. बुधवारी झालेल्या पहिल्या हिमस्खलनाच्या घटनेत एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. हिमवृष्टीमुळे घर बर्फाखाली गाडले गेल्याने ही घटना घडली. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये काश्मीरच्या विविध भागांमध्ये हिमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.