14 November 2019

News Flash

Ayodhya verdict : आम्ही निर्णयाचा नम्रपणे स्वीकार करतो : जफर फारूकी

पुर्नविचार याचिका दाखल केली जाणार नसल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाकडून स्पष्ट

सुन्नी वक्फ बोर्ड उत्तर प्रदेशचे अध्यक्ष जफर फारूकी यांनी अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो व नम्रपणे स्वीकार करतो, असे म्हटले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल तो मान्य असेल असे आम्ही अगोदरच म्हटले होते. त्यामुळे आता सर्वांनी बंधुभावाने या निर्णयाचा आदर करायला हवा असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कोणतीही पुर्नविचार याचिका दाखल केली जाणार नसल्याचेही वफ्फ बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला. ३ महिन्याच्या कालावधीत एका ट्रस्टची स्थापना करून राम मंदिर बांधण्यात यावे, असाही निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.

अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी या आधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. बाकी सगळे वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सुप्रीम कोर्टानं मान्य केला. यामुळे सर्व वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

First Published on November 9, 2019 5:57 pm

Web Title: ayodhya verdict humbly accept the verdict of the supreme court msr 87