योगगुरू रामदेवबाबा यांनी सीताराम येचुरींवर निशाणा साधला आहे. हिंदू हिंसक आहेत, रामायण आणि महाभारत हे त्याचे पुरावे आहेत, असं वक्तव्य सीताराम येचुरींनी केलं होतं. त्यावर रामदेवबाबांनी ही टीका केली आहे. डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरी यांनी त्यांचं नाव बदलून रावण ठेवावं असं रामदेवबाबांनी म्हटलं आहे. तसेच सीताराम येचुरींनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे असंही रामदेवबाबांनी म्हटलं आहे. येचुरी यांच्याविरोधात हरिद्वारमध्ये एफआयआर दाखल केला असून संपूर्ण देशभरात FIR दाखल करण्यात यायला हवा असेही रामदेवबाबांनी म्हटले आहे.

कम्युनिस्टांनी त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जगभरात हत्या केल्या आहेत. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी जगभरात ३० कोटीपेक्षा जास्त हत्या करण्यात आल्या आहेत. मुघलांनीही हत्या केल्या, मात्र हिंदू पहिल्यापासून सहिष्णू आहेत असंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाबा रामदेव यांनी ही टीका केली आहे. सगळ्याच समाजात हिंसक लोक असतात, असंही ते म्हटले.

निवडणूक आयोगाने सीताराम येचुरी यांची उमेदवारी रद्द करावी त्यांची रवानगी तुरुंगात करावी अशीही मागणी रामदेवबाबा यांनी केली. कम्युनिस्ट देवाला मानत नाहीत तरीही त्यांनी त्यांचं नाव सीताराम असं ठेवलं आहे. रामायण आणि महाभारत काल्पनिक आहे असं त्यांना वाटतं तर मग हे नाव तरी का ठेवलं? त्यांनी नाव बदलून रावण ठेवावं असा टोला रामदेवबाबांनी लगावला.

काय म्हटले होते सीताराम येचुरी?

सीताराम येचुरी हे गुरुवारी मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे एका कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात येचुरी यांनी हिंदू धर्माविषयी भाष्य करताना थेट रामायण आणि महाभारताचा दाखला दिला. येचुरी म्हणाले, रामायण आणि महाभारतात हिंसक घटना आणि युद्धाचा उल्लेख आहे. संघाचे प्रचारक म्हणून ही बाजू सांगितलीच जात नाही, रामायण आणि महाभारत हे महाकाव्य असल्याचे सांगितले जाते. रामायण आणि महाभारताचे दाखले दिल्यानंतरही हिंदू हिंसक नसल्याचा दावा केला जातो. एका विशिष्ट धर्माची लोकंच हिंसा करतात, हिंदू हिंसा करत नाही हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. रामायण-महाभारतातही हिंसा आहे, मग हिंदू हिंसक नसतात हे कसं सांगणार, असा सवाल त्यांनी विचारला. याच वक्तव्यावरून सीताराम येचुरी यांच्यावर शिवसेनेने निशाणा साधला आणि आता रामदेवबाबांनीही येचुरी यांना टोला लगावला आहे.