देशात साधूसंतांची एक परंपरा असून त्या परंपरेला कोणीही धक्का लावू नये. पण साधूच्या वेशातील काही लोक साधूसंतांना कलंकित करत आहेत. अशा लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे मत योगगुरु रामदेव बाबा यांनी मांडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानमधील एका तरुणीने दिल्लीतील दाती महाराज या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरुविरोधात बलात्काराची तक्रार केली असून या प्रकरणी दाती महाराजांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पोलीस दाती महाराजांचा शोध घेत असून आसाराम बापू, बाबा राम रहीमनंतर आणखी एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर रामदेवबाबा यांनी कोटा येथे माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, काही लोकं चांगल्या कामात अडथळा ठरत आहे. साधूच्या वेशातील काही लोक साधूसंतांच्या परंपरेला कलंकित करत आहेत.  या लोकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अशा लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोटा येथे ३ दिवसांच्या योगशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रामदेवबाबा कोटा येथे आले होते. ते म्हणाले, योग हे शरीरासाठी उपयुक्त असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले असून योग हे धर्मनिरपेक्ष आहे. योगाचा राजकारण किंवा धर्माशी संबंध नाही. श्वसन प्रक्रिया आणि शारीरिक व्यायामामुळे कोणाचा धर्म कसा काय बदलू शकतो. योगमुळे मानसिक आजारांवरही मात करता येते, असे त्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba ramdev reaction on daati maharaj rape case
First published on: 19-06-2018 at 03:01 IST