मणिपूरमध्ये भारतीय सैन्याच्या १८ जवानांना ठार करण्यास जबाबदार असलेल्या एनएससीएन (के) या संघटनेवर बंदी घालण्याची सरकारने तयारी केली आहे.
गेल्या ४ जून रोजी सैनिकांवर करण्यात आलेला हल्ला आणि त्यानंतर सुरक्षा दलांवरील हल्ल्यांची मालिका यामुळे एस.एस. खापलांग यांच्या नेतृत्वाखालील नागा बंडखोर गटाला बेकायदेशीर जाहीर करण्यात यावे, अशा आशयाचे टिपण गृहमंत्रालयाने केंद्रीय मंत्रिमंडळासाठी तयार केले आहे.
मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर एनएससीएन (के) ही संघटना प्रतिबंधित गट म्हणून जाहीर करण्यात येईल आणि तिचे नाव बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली बंदी घालण्यात आलेल्या संघटनांच्या यादीत समाविष्ट केले जाईल.
एनएससीएन (के) ही २००१ सालापर्यंत प्रतिबंधित संघटना होती, परंतु या गटाने सरकारसोबत युद्धबंदीचा करार केल्यानंतर तिच्यावरील बंदी मागे घेण्यात आली. म्यानमारमधील नागा नेते असलेले खापलांग हे त्या देशातच असून त्यांच्या गटाचे बहुतांश तळ तेथे असल्याचे मानले जाते. भारताचे १८ सैनिक मारले गेल्यानंतर लष्कराच्या विशेष दलाच्या कमांडोंनी म्यानमारमध्ये आतपर्यंत घुसून बंडखोरांवर हल्ला चढवला होता.