कावेरी पाणीतंटय़ामुळे बंगळुरूत दोन जणांचे बळी गेल्यानंतर आता तेथे हळूहळू शांतता निर्माण होत आहे. तामिळनाडूला कावेरीचे पाणी सोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर तेथे हिंसक निदर्शने झाली होती. दरम्यान, आता वाहतूक सुरळीत झाली असून, दुकाने व आस्थापने खुली आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, की अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सोमवारी रात्री तेथे संचारबंदी लागू केली होती, तेथे अजूनही प्रतिबंधात्मक आदेश जारी आहेत. सरकारने शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली नव्हती, पण तरी काही खासगी संस्थांनी शाळा, महाविद्यालये बंद ठेवली होती. सोमवारपासून हिंसाचारात बंगळुरूमध्ये दोन जण मरण पावले आहेत.

शहरात तणावपूर्ण शांतता असून निदर्शनांचे प्रकार काल झाले. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूला १२ हजार क्युसेक पाणी २० सप्टेंबपर्यंत सोडण्याचे आदेश दिले होते. ५ सप्टेंबरच्या आदेशात १५ हजार क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या सुधारित आदेशाने लोकांचे समाधान झाले नव्हते.

तामिळनाडूतील शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी कर्नाटकने पाणी सोडण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर ९ सप्टेंबरला काही संघटनांनी कर्नाटकात बंद पाळला होता.

बंगळुरूत पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या एकाचे नंतर निधन झाले. तो पोलिसांच्या लाठीमारातून वाचण्यासाठी पळत गेला व त्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती.

मंडय़ा, म्हैसुरू, चित्रदुर्गस रामनगरा येथे किरकोळ निषेध आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले, की ते पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन या प्रश्नावर बैठक घेण्याची मागणी करणार आहेत. दरम्यान, काँग्रेस आमदारांची बैठक घेऊन त्यांनी सोमवारच्या निषेध आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.