प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री अंजू घोष यांनी बुधवारी कोलकात्यात प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. अंजू घोष ३० वर्षांपूर्वी बांगलादेशी चित्रपट सृष्टीत सुपरस्टार होत्या. त्यांच्या १९८९ साली आलेल्या ‘बेदर मयी जोसना’ चित्रपटाने बांगलादेशी चित्रपट सृष्टीत इतिहास रचला होता. १९९१ साली पश्चिम बंगालमध्ये पुन्हा या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी सुद्धा हा चित्रपट हिट ठरला होता.

५३ वर्षीय अंजू घोष यांच्याकडे आता भारतीय पासपोर्ट आणि वोटर कार्ड आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यात अंजू घोष यांना पासपोर्ट जारी करण्यात आला. दिलीप घोष यांनी अंजू यांच्या हाती भाजपाचा झेंडा देऊन पक्षात त्यांचे स्वागत केले. दोन महिन्यांपूर्वी एका लोकप्रिय बांगलादेशी कलाकार तृणमुल काँग्रेसचा प्रचार करताना दिसला होता.

त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्याला तात्काळ भारत सोडायला सांगण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतात आलेल्या फिरदोस अहमदचा बिझनेस व्हिसा रद्द करुन त्याला तात्काळ देश सोडण्यास सांगितले होते. फिरदोस अहमदने अनेक बंगाली चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

अंजू घोष यांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी भाजपाला लक्ष्य केले. बांगलादेशी व्यक्ती भारतातील राजकीय पक्षाचे सदस्यत्व कसे स्वीकारु शकते असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. अंजू घोष यांच्या पक्षप्रवेशावरुन तृणमुल काँग्रेसने भाजपाला टोला लगावला. भारतीय जनता पार्टी लवकरच बांगलादेशी जनता पार्टी बनणार आहे. बांगलादेशी कलाकाराने भाजपामध्ये प्रवेश केला. खऱ्या अर्थाने भाजपा आंतरराष्ट्रीय पक्ष बनला आहे असे उपरोधिक टि्वट दीपतानसू चौधरी यांनी केले आहे.