News Flash

बांगलादेशात आयसिसकडून प्राध्यापकाचा गळा चिरून खून

इंग्रजीच्या प्राध्यापकाची आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्यांच्या घराजवळ हत्या केली.

| April 24, 2016 02:38 am

आयसिस (संग्रहित छायाचित्र)

बांगलादेशात वायव्य भागातील एका विद्यापीठातील इंग्रजीच्या प्राध्यापकाची आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्यांच्या घराजवळ हत्या केली.
राजशाही विद्यापीठाचे प्राध्यापक एएफएम रेझाउल करीम सिद्दीकी यांच्यावर राजशाही शहरातील निवासस्थानापासून ५० मीटर अंतरावर मोटारसायक लवरून आलेल्यांनी हल्ला केला. सिद्दीकी हे विद्यापीठात जाणारी बस पकडत असताना दहशतवाद्यांनी धारदार हत्याराने त्यांचा गळा चिरून फेकून दिले. त्यांच्यावर मागून कोयत्याने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, समाजकंटकांनी विद्यापीठ आवारात त्यांच्यावर सकाळी साडेसात वाजता हल्ला केला. त्यात ते जागीत मरण पावले.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोन जण मोटारसायकलवर जाताना दिसले. हा हल्ला आम्हीच केला असा दावा आयसिसने केल्याची माहिती अमेरिकेतील साइट या गुप्तचर संस्थेने दिली. आयसिसच्या अमाक यासंस्थेने सांगितले की, राजशाही विद्यापीठातील प्राध्यापक रेझाउल करिम यांना आम्हीच ठार केले. बांगलादेशात निरीश्वरवाद असावा असे या प्राध्यापकांनी म्हटले होते त्यामुळे त्यांना मारले असे सांगण्यात आले. राजशाहीचे पोलीस आयुक्त महंमद शमशुद्दीन यांनी सांगितले की, घटनास्थळी गेल्यानंतर जे दिसले त्यावरून तरी ते इस्लामी दहशतवाद्यांचे कृत्य आहे. हल्लेखोरांनी प्राध्यापक रिझाउल करीम सिद्दीकी यांच्या मानेवर तीनदा कोयत्याचे वार केले व त्यांचा गळा ७० ते ८० टक्के चिरून टाकण्यात आला.
दरम्यान, संतप्त विद्यार्थी व शिक्षकांनी गुन्हेगारांना अटक करण्याच्या मागणीसाठी निषेध आंदोलन केले. सिद्दिकी हे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असत व बासरी तसेच सतार वाजवत असत. त्यांचा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध नव्हता पण ते पुरोगामी मताचे होते त्यामुळे त्यांच्यावर राग असावा असे मास कम्युनिकेशन विभागाचे प्राध्यापक दुलालचंद्र विश्वास यांनी सांगितले.

यापूर्वीच्या हत्या..
राजशाही विद्यापीठात दोन वर्षांपूर्वी एकेएम शफीउल इस्लाम यांचा असाच खून झाला होता. त्याच्या आधी काही वर्षे आणखी दोन प्राध्यापकांचा खून झाला होता. बांगलादेशात गेल्यावर्षी चार धर्मनिरपेक्ष ब्लॉगर्सचा खून झाला होता तर फेब्रुवारीत हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याचा खून झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 2:38 am

Web Title: bangladesh professor hacked to death by alleged isis militants
टॅग : Isis
Next Stories
1 भाजप विरोधकांना एकत्र आणण्यात माझी मध्यस्थाची भूमिका – नितीश कुमार
2 पनामा पेपर्स प्रकरणी मोझॉक फोन्सेकावर छापे
3 परवेझ मुशर्रफ यांचा न्यायालयात हजेरीतून सूट मागणारा अर्ज फेटाळला
Just Now!
X