बँकेकडून अनेकवेळा ग्राहकाच्या खात्यावर चुकून पैसे जमा झाल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. बँकेकडून नंतर त्या ग्राहकाला झालेली चूक सांगून पैसे परत खात्यातून वजा केले जातात. परंतु, गुजरातमध्ये एक अजब प्रकार घडला. गुजरातमधील अदाजन येथे बँक ऑफ इंडियाने २० लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आपल्या एका ग्राहकावर गुन्हा दाखल केला आहे. बँकेचे सॉफ्टवेअर अपडेट होताना चुकून एका व्यक्तीच्या दोन खात्यात २० लाख रूपये जमा झाले. पैसे परत करण्याऐवजी त्याने चक्क ते खर्च केले. आता याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. परेश गोधानी असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

बँकेचे व्यवस्थापक राजीव माथूर यांनी पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. ऑक्टोबर २०१७ मध्ये बँकेच्या महल रोड शाखेत डेटा अपग्रेडशनदरम्यान गोधानीच्या दोन बँक खात्यात २०.२६ लाख रूपये जमा झाले होते. अशा पद्धतीने इतर काही ग्राहकांच्या खात्यावरही पैसे हस्तांतरीत झाले होते.

बँकेच्या अधिकाऱ्यांना जेव्हा याबाबत लक्षात आले. त्यांनी त्वरीत संबंधित ग्राहकांशी संपर्क साधला आणि त्यांना पैसे परत देण्याची विनंती केली. गोधानी वगळता सर्व खातेधारकांनी पैसे परत दिले. गोधानीच्या बँक खात्यात २० लाख जमा होण्यापूर्वी काहीच रक्कम शिल्लक नव्हती. पैसे जमा होताच त्याने सर्व पैसे खर्च केले.

गोधानीने आपल्या डेबिट कार्डचा उपयोग करत पैसे खर्च केले. त्याचे या बँकेत बचत आणि चालू खाते होते. या दोन्ही खात्यात ही रक्कम जमा झाली होती. बँकेची फसवणक केल्याप्रकरणी गोधानीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.