अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गुरुवारी सौदी अरेबियात आखाती देशांच्या नेत्यांची भेट घेतली आणि अमेरिकेसोबतचे संबंध तणावाचे असले तरी इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाविरुद्धची मोहीम तीव्र करण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष या नात्याने अमेरिकेच्या ऐतिहासिक मित्रांच्या घेतलेल्या अखेरच्या भेटीत ओबामा यांनी येथील शाही राजवाडय़ात सुमारे चार तास चर्चा करण्यापूर्वी सौदी अरेबियाचे राजे सलम यांच्यासह सहा क्षेत्रीय नेत्यांसोबत छायाचित्रही काढून घेतले. आपला क्षेत्रीय शत्रू असलेल्या शियाबहुल इराणकडे अमेरिकेने मैत्रीचा हात पुढे केल्यामुळे नाराज असलेल्या आपल्या सुन्नी मित्रराष्ट्रांना मदतीची हमी देण्याचा हा ओबामा यांचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. इराक व सीरियाच्या बऱ्याच मोठय़ा भागावर ताबा मिळवणाऱ्या आयसिसच्या सुन्नी अतिरेक्यांविरुद्ध अमेरिकेने अलीकडे प्रगती केल्याच्या पाश्र्वभूमीवर ही परिषद होत आहे.