न्यू यॉर्क : डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा वापर ‘रिअ‍ॅलिटी शो’प्रमाणे केल्याचा आरोप करतानाच, ते या पदाला न्याय देऊ शकले नाहीत, कारण त्यांची तेवढी क्षमता नव्हती, अशी घणाघाती टीका अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे.

कॅलिफोर्नियाच्या कमला हॅरिस या बुधवारी एखाद्या मोठय़ा राजकीय पक्षाने उपाध्यक्षपदासाठी औपचारिकरीत्या नामांकित केलेल्या पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्ती ठरल्या. त्याच्या काही वेळ आधी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या आभासी राष्ट्रीय परिषदेत ओबामा यांचे भाषण झाले. ते देशाचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. माजी उपाध्यक्ष जो बायडेन यांची यापूर्वीच अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. येत्या ३ नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लढवणाऱ्या ट्रम्प यांच्यावर ओबामा यांनी कठोर टीका केली. ‘या पदासाठी लढत असलेल्या दोन्ही लोकांसोबत मी ओव्हल कार्यालयात काम केले आहे. माझे उत्तराधिकारी माझ्या दृष्टिकोनाचा स्वीकार करतील किंवा माझी धोरणे कायम ठेवतील अशी मी कधीही अपेक्षा केली नव्हती’, असे ते म्हणाले.

अध्यक्षपदी गांभीर्याने काम करण्यात ट्रम्प कदाचित रस घेतील अशी मला आशा होती, मात्र त्यांनी कधीच तसे केले नाही, अशीही टीका ओबामा यांनी केली.