कोलकातामध्ये आयसीसीची बैठक पार पडणार असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन नजम सेठी यानिमित्ताने भारतात आले आहेत. भारत-पाकिस्तान मालिका न खेळण्यावरुन त्यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे. बीसीसीआयला जर भारतीय संघाच्या पाकिस्तानमधील आणि पाकिस्तान संघाच्या भारतामधील सुरक्षेसंबंधी चिंता आहे तर मग तिसऱ्या देशात मालिका का खेळवली जात नाही अशी विचारणा त्यांनी केली होती. बीसीसीआयला जर सरकारच्या परवानगीची इतकी काळजी होती तर मग २०१५ ते २०२३ पर्यंत आठ वर्षांत पाच मालिका खेळवण्याचा करार कशासाठी केला होता असंही त्यांनी विचारलं. दरम्यान नजम सेठी यांच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना आधी भारताचा आदर करायला शिकवा असा टोला मारत सुनावलं आहे. पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली याचा वाघा बॉर्डरवरील व्हिडीओचाही बीसीसीआयने उल्लेख केला आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या देशाचा साधा आदर न करु शकणाऱ्या देशासोबत खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकारी परवानगीचा प्रश्न तर बाजूलाच राहिला. पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली ज्याप्रकारे वाघा बॉर्डरवर वागला आहे, सोबतच शाहिद आफ्रिदीने काश्मीर मुद्द्यावर जे ट्विट केलं यावरुनच भारतीय बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं सिद्ध होतंय. पाकिस्तानच राजकारण आणि खेळाला एकत्र करत आहे.

‘नजम यांना एक गोष्ट समजली पाहिजे की, ज्याप्रकारे पाकिस्तानात पीसीबी सरकारी धोरणांचा निर्णय घेत नाही, त्याचप्रमाणे भारतात बीसीसीआय सरकारची धोरणं ठरवत नाही. आमची संस्था देशातील कायद्याशी बांधील आहे, आणि त्याचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. पाकिस्तानमध्ये कायद्याचं पालन करणं पर्यायी असू शकतं, पण भारतात नाही’, असंही अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘नजम यांना माझी विनंती आहे हसन अलीने आपल्या वागण्याने केलेले भारताचा अपमान तसंच माजी क्रिकेटर करत असलेल्या वक्तव्यांवर निर्बंध आणि आणि कारवाई करा जेणेकरुन क्रिकेटसाठी पोषक वातावरण मिळेल. त्यांनी किमान जेंटलमनची संकल्पना तरी समजून घ्यावी’.

दरम्यान आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान सामना होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात होणारी आशिया कप स्पर्धा भारतातून दुबईत हलवण्यात आली आहे.