२०१९ च्या निवडणुकांमध्ये रायबरेलीतून ना सोनिया गांधी निवडून येतील ना प्रियंका गांधी अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिनेश प्रताप सिंह यांनी केली आहे. दिनेश प्रताप सिंह हे शनिवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. त्याआधी त्यांनी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे. तसेच २०१९ ला सोनिया आणि प्रियंका गांधी कोणीही रायबरेलीतून निवडून येणार नाही असे म्हटले आहे. माझ्या लहान भावाला अर्थात राकेश सिंहला २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीच भाजपाने तिकिट देऊ केले होते. मात्र माझ्या शब्दाखातर त्याने ते घेतले नाही.

माझ्या भावाला काँग्रेस पक्षाने तिकिट द्यावे अशी विनंती मी प्रियंका गांधींना केली होती. त्यांनी माझी विनंती धुडकावून लावली आणि रायबरेलीतून कोणत्याही ठाकूर समाजाच्या माणसाला तिकिट देणार नाही असे म्हटले. मात्र नंतर त्यांनी माझ्या भावाला हरचंदपूर येथून तिकिट दिले. काँग्रेसने मात्र सिंह यांचे आरोप बिनबुडाचे आहेत त्यांनी त्यांच्या लहान भावासाठी कधीही तिकिटाची मागणी केली नव्हती असे म्हटले आहे.

मात्र काँग्रेसमध्ये माझी घुसमट वाढू लागली. मी विधान परिषदेच्या आमदारकीचा पदाचा राजीनामा देऊ केला मात्र प्रियंका गांधी यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. मी माझ्या राजीनाम्याबाबत प्रियंका गांधी यांना फोन केला. तेव्हा त्यांनी काँग्रेस आणि सपाची युती झाली तर तुमचा राजीनामा स्वीकारू असे त्यांनी म्हटले. यानंतर मी आणखी नाराज झालो आणि पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असेही दिनेश सिंह यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीसाठी मी खूप काही केले. मला त्याचा मोबदला म्हणून मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रियंका गांधी यांनी माझी सगळी स्वप्ने धुळीस मिळवली. दिनेश सिंह यांचा आणखी एक लहान भाऊ अवदेश सिंह यानेही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रायबरेलीत काँग्रेसला हा मोठा झटका मानला जातो आहे.

मी आता भाजपामध्ये प्रवेश करतो आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याचे मी ठरवले आहे. रायबरेलीतून सोनिया गांधी उभ्या राहोत किंवा प्रियंका गांधी त्यांच्यापैकी कोणीही निवडून येणार नाही हा शब्द मी भाजपाला दिला आहे असेही आता सिंह यांनी सांगितले आहे. दिनेश सिंह यांनी काँग्रेसवर आरोप केलेले असताना काँग्रेसनेही त्यांच्यावर टीका केली आहे. दिनेश सिंह यांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधणे ठाऊक आहे. ते सपा मध्ये असताना निवडणूक जिंकू शकले नाहीत, मग ते बसपामध्ये गेले तिथेही त्यांना निवडणूक जिंकता आली नाही. हे दोन्ही पक्ष त्यांना सोडावे लागले ज्यानंतर त्यांना काँग्रेसने आश्रय दिला विधानपरिषदेची आमदारकी दिली. मात्र आता ते आपल्या स्वार्थासाठी पक्षाला विसरले अशी टीका काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व्ही. के. शुक्ला यांनी केली आहे.